नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शेवटच्या दिवशी लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. मोदींचे पत्र हृदयाला भिडले असे मुखर्जी यांनी म्हटले आहे. दोन विभिन्न राजकीय विचारप्रणालींचे प्रतिनिधीत्व करणारे मुखर्जी आणि मोदी यांच्यात नेहमी सुसंवादच राहिला. प्रणवदांना मोदींनी लिहिलेल्या पत्रात उत्तुंग वैचारिक उंचीचे लोक सहृदयी असतात. त्यांच्यात लोकशाहीची दृष्टी असते, असे निरीक्षण नोंदविले आहे.
या ट्विटला मोदींनीही प्रतिसाद देऊन आपल्यासोबत काम करण्यास मजा आली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मोदींनी पत्राची सुरूवात प्रणवदा या संबोधनाने केली आहे. दिल्लीत मी उपरा होतो. माझ्यापुढे खूप मोठी आव्हाने होती. अशा परीक्षेच्या काळात तुम्ही माझ्या पाठीशी पित्याप्रमाणे आणि मार्गदर्शकाप्रमाणे उभे राहिलात. तुमची विद्वत्ता, अनुभव आणि माणुसकीने मला आत्मविश्वास दिला, असे मोदी यांनी प्रांजळपणे सांगितले आहे.
प्रणवदा, आपला दोघांचा राजकीय प्रवास भिन्न पक्षांमध्ये झाला. मला राज्याच्या प्रशासनाचा अनुभव, तर तुम्ही दशकोनदशके राष्ट्रीय आणि वैश्विक घडामोडींचे साक्षीदार. तुमच्यातील उदात्त बौद्धिक सामर्थ्यामुळेच आपल्यात सुसंवाद होता. इतके असामान्य असुनही आपण माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला सांगायचतात.
तुम्ही अशा पिढीचे शिलेदार आहात की जेव्हा राजकारण म्हणजे सर्वकाही समाजाला अर्पण करायचं असतं हा विचार होता. तुम्ही असामान्य गुणवत्तेचे राष्ट्रपती असुनही जनतेचे सेवक म्हणून अखंड नम्रतेत राहिलात. यासाठीच तुम्ही भारतीय लोकांसाठी प्रेरणास्थान रहाल. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे असामान्य लोकशाही मुल्य ही माझ्यासाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठेव आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.