प्रणव, सिकी उपांत्य फेरीत, श्रीकांतचेही आव्हान संपुष्टात

0

टोकीयो । जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरी लढतींमधील भारताचे आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. भारतासाठी समाधानाची बाब म्हणजे मिश्र दुहेरीतील भारतीय जोडी प्रणव चोपडा आणि एन सिकी रेड्डीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणार्‍या श्रीकांतचा जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या आणि स्पर्धेत तिसरे मानाकंन मिळालेल्या विक्टर एक्सेलसनने उपांत्यपूर्व फेरीत 21-17, 21-17 असा पराभव केला. याविजयामुळे विक्टरची श्रीकांतविरुद्धच्या पाच सामन्यांतली कामगिरी 3-2 अशी झाली आहे. सय्यद मोदी ग्रापी गोल्ड स्पर्धा जिंकणार्‍या प्रणव जेरी चोपडा आणि सिक्की रेडीने स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राखताना कोरियाच्या सियुंग जाए सो आणि किम हा नो या जोडीवर 21-18, 9-21, 21-19 अशी मात दिली. उपांत्य फेरीत या जोडीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि सायाज हिरोता या जोडीशी होईल.

पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत अमेरिकन ओपन विजेत्या एच.एस. प्रणॉयला चीनच्या दुसरे मानाकंन मिळालेल्या शि युकीने 21-15, 21-14 असे हरवले. विक्टरविरुद्धच्या लढतीत श्रीकांतने पहिल्या आणि दुसर्‍या गेममध्ये अनेक चुका केल्या आणि मिळालेल्या संधीचा फायदा उचलला नाही. दुसरीकडे विक्टरने स्मॅशेसचा प्रभावी वापर करत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. पहिल्या गेममध्ये विक्टरने 4-1 अशी आघाडी घेतली, पण श्रीकांतने 4-4 अशी बरोबरी केली. परत विक्टरने 8-6 अशी आघाडी मिळवली.

श्रीकांतने ही पिछाडी मागे टाकत 11-10 अशी आघाडी घेतली. या आघाडी दरम्यान श्रीकांतचा एक फटका नेटमध्ये अडकला, मोठ्या रॅलीज खेळून श्रीकांतने 14-13 अशी बढत घेतली. 16-16 अशी बरोबरी असताना विक्टरने व्हिडीओ रेफरल मागितला आणि त्याचा हा प्रयत्न गुण मिळवून देण्यात यशस्वी झाला. त्यानंतर विक्टरने उर्वरित गुण मिळवून पहिला गेम जिंकला. दुसर्‍या गेममध्ये श्रीकांतने चांगली सुरुवात केली पण त्यात त्याला सातत्य राखता आले नाही. या दरम्यान त्याच्याकडून झालेल्या चुकांचा विक्टरने पुरेपूर फायदा उचलत 18-14 अशी आघाडी घेतली. या पिछाडीनंतर श्रीकांतने दोन गुण मिळवले पण त्यानंतर विक्टरने तीन मॅच पॉइंट जिंकून उपांत्य फेरीतले स्थान निश्‍चित केले.