ग्लासगो । ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती पी.व्ही सिंधू, बी साई प्रणित आणि अजय जयरामने सहज विजय मिळवत जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे. दुसरीकडे दुहेरीच्या लढतींमध्ये दोन पराभव पत्कराल्यानंतर भारताला पहिला विजय मिळाला. प्रणव चोपडा आणि एन सिकी रेड्डीने मिश्र दुहेरी स्पर्धेच्या तिसर्या फेरीत स्थान मिळवले आहे. स्पर्धेत 2013 आणि 14 मध्ये कांस्यपदक मिळवणार्या सिंधूने महिला एकेरीतील दुसर्या फेरीत कोरियाच्या किम ह्यो मिनवर 21-16, 21-14 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थाब मिळवले. मिनविरुद्ध मिळवलेला सिंधूचा हा चौथा विजय आहे. तर मिनला एकदाच सिंधूला पराभूत करता आले. 22 वर्षीय सिंधूला पहिल्या सामन्यात बाय मिळाली होती. पुढील लढतीत तिचा सामना रशीयाची येवगेनिया कोसेत्सकाया आणि हाँगकाँगच्या 13 व्या मानांकित चेयुंग नगान यांच्या लढतीतील विजयी खेळाडूशी होईल.
चौथे मानाकंन मिळालेल्या सिंधूने 49 मिनीटांमध्ये किमवर विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळत सलग आठ गुण मिळवले. त्यानंतर किमने दोन गुण मिळवत सिंधूला रोखले. पहिल्या ब्रेकमध्ये सिंधूने 11-5 अशी आघाडी मिळवली होती. एकिकडे सिंधूने आघाडी कायम राखली तर दुसरीकडे किमनेही जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. दुसर्या गेममध्ये किमने 3-7 अशी मुसंडी मारली. पहिल्या ब्रेकपर्यंत सिंधूने 11-8 अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी सिंधूने 17-11 अशी वाढवली.
सिंगापूर ओपन स्पर्धेचा विजेता प्रणित आणि 13 वे मानाकंन मिळालेल्या अजय जयरामने दुसर्या फेरीत प्रवेश केला. प्रणितने हॉगकाँगच्या वेई नानचा 21-18, 21-17 असा सरळ पराभव केला. दुसर्या फेरीत प्रणितला इंडोनिशीयाच्या एंथोनी सिनिसुका गिनटींगच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. अजय जयरामने ऑस्ट्रियाच्या लुका व्रेबरचा 21-14, 21-12 असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या लढतीत प्रणव आणि सिक्की या जोडीने मलेशियाच्या योगेंद्र कृष्णन आणि प्राजक्ता सावंत या जोडीचा 21-12, 21-19 असा पराभव केला.