प्रतवारीनुसार डाळींब कॅरेटमध्ये विक्रीसाठी आणण्यास व्यापार्‍यांचा विरोध

0

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने काढलेले परिपत्रक रद्द करण्याची मागणी

पुणे । डाळिंबाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी जागेवरच त्याची प्रतवारी करून कॅरेटमध्ये विक्रीसाठी आणावे, असे परिपत्रक पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने काढले होते. या परिपत्रकाला गुलटेकडी मार्केटयार्ड येथील डाळिंब व्यापार्‍यांसह आडते असोसिएशननेही विरोध केला आहे. हे परिपत्रक बाजार समितीने त्वरीत रद्द करावे, अशी भुमिका सर्व व्यापार्‍यांनी घेतली आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळविभागात सोलापूर, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात डाळींबाची आवक होते. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शेतकर्‍यांकडून हे डाळींब प्रतवारी न करता टेम्पोतून आणले जातात. माल आल्यानंतर त्याची प्रतवारी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने तसेच मनुष्यबळाची कमतरता असल्याने त्यासाठी अधिक वेळ लागतो. परिणामी डाळिंबाला कमी भाव मिळतो. या गोष्टी टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी डाळिंबाची प्रतवारी करूनच कॅरेटमध्ये माल विक्रीस आणावा. यासाठी शेतकर्‍यांनी यापुढे योग्य नियोजन करूनच डाळींबाची तोडणी व प्रतवारी करून कॅरेटमध्ये माल विक्रीस पाठवावा, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने केले होते. त्यासंबंधीचे परिपत्रकही काढण्यात आले होते. या आवाहनाला काही व्यापार्‍यांसह आडते असोसिएशनने विरोध दर्शविला आहे.

ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता
चर्चा न करता परस्पर अशा प्रकारचे परिपत्रक काढणे चुकीचे आहे. शेतकर्‍यांना जागेवर प्रतवारी करणे शक्य होणार नाही. खाली खराब आणि वर फक्त चांगले डाळींब भरण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये व्यापार्‍यांबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक होणार आहे. त्याबरोबरच माथाडी-भराईचाही प्रश्‍न अनुत्तरितच राहिलेला आहे. बाजार समितीने काढलेल्या या परिपत्रकाला विरोध असून ते त्वरीत रद्द करावे. तसेच व्यापार्‍यांशी चर्चा करूनच त्याबाबतचा योग्य तो निर्णय सर्वानुमते घेण्यात यावा, अशी मागणी व्यापारी सौरभ कुंजीर यांनी केली आहे.

बाजार समितीचा एककल्ली कारभार
या विषयी चर्चा करण्यासाठी डाळींब व्यापार्‍यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतू ही बैठक आयत्या वेळी रद्द करून थेट परिपत्रक काढले गेले. बाजार समितीच्या अशा प्रकारच्या अनेक निर्णयात धरसोड वृत्ती चुकीची असून त्यांनी त्याबाबत संबंधितांशी चर्चा करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच माथाडी-हमालांचाही विचार होणे गरजेचे आहे. परंतू बाजार समिती सध्या एककल्ली कारभार करीत असून व्यापार्‍यांना तसेच आडते असोसिएशनला विश्‍वासात घेत नाही.- विलास भुजबळ, अध्यक्ष, आडते असोसिएशन

चर्चा न करता निर्णय घेणे चुकीचे
या निर्णयाबाबत डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांची चर्चा केली आहे. शेतकर्‍यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. मजूर मिळत नसताना त्यामध्ये प्रतवारी करणे हे शक्य होणार नाही. बाजार समितीने चर्चा न करता हा निर्णय घेणे चुकीचे आहे. त्यातच बाजार आवाराशी निगडीत असलेल्या इतर घटकांचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हमाल आणि माथाड्यांचा या परिपत्रकामध्ये उल्लेख नाही. त्यामुळे बाजार समितीने हे परिपत्रक त्वरीत रद्द करून व्यापारी, शेतकरी तसेच बाजारातील इतर घटकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असे व्यापारी सिध्दार्थ खैरे यांनी सांगितले.