प्रतापनगरात दुकानाची तोडफोड

0

जळगाव । शहरशातील प्रतापनगरातील न्यू इलू व्हिडीओ पार्लर मधील टेबलवर बसण्यास 27 मार्च रोजी काही तरूणांना मज्जाव केला होता. त्याचा राग मनात ठेऊन गुरूवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास 8 ते 10 तरूणांनी दुकानावर दगडफेक करून दुकान मालकासह मुलालाही मारहाण केली आहे. यातच तरूणांनी दुकानातील वस्तूंची तोडफोड करून दुकानावर दगडफेक केल्याची घटना घडली. यानंतर रात्री लागलीच दुकान मालकांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत तोडफोड करणार्‍या तरूणांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे मात्र, परिसरात खळबळ उडाली.

प्रतापनगरात निवृत्त पोलिस कर्मचारी जगन्नाथ श्रीपत पाटील (वय 75, रा. खानदेश मील कॉलनी) यांच्या मालकीचे न्यू इलू व्हिडीओ पार्लर आहे. त्या दुकानातील टेबलवर ज्ञानेश्वर काशिनाथ सूर्यवंशी हे कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करतात. त्यांच्या टेबलवर 27 मार्च रोजी काही तरूण बसले होते. त्यांना बसण्यासाठी मज्जाव केला. त्यावेळी त्या तरूणांनी पाटील यांच्याशी अरेरावी केली होती. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास तेच तरूण रिक्षाने (क्र. एमएच-19-व्ही-6835) तर काही तरूण रिक्षा आणि दुचाकीवर आले. त्यांनी शिविगाळ करून जगन्नाथ पाटील त्यांचा मुलगा संजय पाटील यांनाही मारहाण करून दुकानावर दगडफेक केल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच दुकानातील टिव्ही, कॉम्प्युटरची तोडफोड करून सामानाची फेकफाक केली. अर्धातास धुमाकूळ घातल्यानंतर हे तरूण पसार झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

प्रतापनगरात दुकानाची तोडफोड झाल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना मिळताच त्यांनी लागलीच प्रतापनगर गाठत दुकानाची पाहणी केली. यानंतर त्यांनी तात्काळ संशयित तरूणांचा परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू एकही तरूण मिळून आला नाही. यानंतर संजय पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत मारहाण व तोडफोड करणार्‍या तरूणांविरूध्द तक्रार दाखल केली. दिवसेंदिवस गँगवारच्या घटना शहरात वाढत असल्याचे चित्र अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. यांना आळा घालण्याची आता गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

‘गुंडे है हम’
प्रतापनगरात धुमाकूळ घालणार्‍या तरूणांनी पाटील यांना आम्ही गुंडे आहोत. आमचे कोणीच काहीच करू शकत नसल्याचे सांगून धमकी देऊन निघून गेले. तर दुचाकीवरही मागच्या बाजुला ‘गुंडे है हम’ असे लिहीलेले होते. त्यामुळे या गुंड्यावर कोण आवर घालणार हा प्रश्नच आहे. यातच दिवसेंदिवस नवीनवीन गँग तयार होवून रोज चाकू हल्ले, तलवार हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. यातच अल्पवयीन मुलांचा या गँगमध्ये सर्वात जास्त समावेश असून हल्ला करण्यासाठी यांचा वापर केला जात असल्याचेही अनेक वेळा समोर येत आहे. त्यातच या गुंडांवर कधी आळा बसेल असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.