चोपडा। गणित हा विषय शालेय शिक्षणात वैकल्पिक विषय होऊ नये. गणिताची स्वतःची भाषा असून जी तार्किकता गणितात असते तीच आयुष्याची भाषा असली पाहिजे. गणित हा विषय विद्यार्थ्यांना कठीण वाटत असले तरी तरी विद्यार्थ्याला ते त्याच्या स्वतःच्या अनुभवातून शिकवायला पाहिजे, असे मत पुणे येथील मॉडर्न कॉलेज मधील निवृत्त प्रा.विपूला अभ्यंकर यांनी व्यक्त केले. ते प्रताप विद्या मंदिराच्या शतक महोत्सवानिमित्त गणित प्रयोगशाळा उद्घाटन व कार्यशाळा वेळी उद्घाटन म्हणून बोलत होते.
दोन दिवस चालली कार्यशाळा
प्रताप विद्या मंदिराच्या प्रार्थना सभागृहात उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. 16 व 17 जुलै या दोन दिवसीय गणित कार्यशाळा संपन्न झाली. त्यात कार्यशाळेत विविध गणितीय संबोध व स्पर्धा परिक्षातील बहुपर्यायी प्रश्न निर्मितीवर कृतीयुक्त मार्गदर्शन शिक्षकांना मिळाले. यावेळी व्यासपीठावर याप्रसंगी मंचावर कार्यशाळेच्या तज्ञ मार्गदर्शिका पुणे येथील प्रा रमा सप्तर्षी (निवृत्त प्राध्यापिका, एस पी कॉलेज व पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम निर्मिती मंडळाच्या सदस्या ), प्रा रूबी आर पी (रिसर्च इंजिनीयर,पुणे) यांच्यासह संस्थेच्या सेक्रेटरी माधुरी मयूर, संचालक चंद्रहास गुजराथी, शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा पाटील, केंद्र प्रमुख नरेंद्र सोनवणे हे उपस्थित होते.
शताब्दी वर्षातील विशेष उपक्रम
माधुरी मयूर यांनी, प्रयोगशाळा एक मैलाचा दगड ठरेल. गणित हे आयुष्य कसे जगायचे सांगणारे एक गमक आहे. शताब्दी वर्षातील विशेष उपक्रमातील हा एक महत्वाचा उपक्रम आहे असे सांगितले. संगीतशिक्षक प्रदीप कोळी यांनी गजानन तापकिर यांचा ’शुन्याची महती’ पोवाडा, ’झुक झुक पीव्हीएमची गाडी’ हे डी.एस.शाहचे गीत ए.ए.ढबू यांनी सादर केले.
उद्घाटनात गणितीय चिन्हे अवतरली
मान्यवरांनी प्रवेशद्वारावरील फुगे फोडल्यानंतर बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मुलभूत क्रियांची चिन्हे अवतरली. तालुक्यातील विविध शाळांमधील गणित व विज्ञान शिक्षक यांच्या सहभागातून गणितातील अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, संख्येचे अवयव पाडणे, विविध भौमितिक आकृत्यांचे सूत्र शोधून काढणे, आयलरचे सूत्र, त्रिकोणमिती यासारख्या अनेक संकल्पना सोप्या करून दाखविल्या तसेच अध्यापन करतेवेळी मुलांना कसे जागरूक करावे व हसतखेळत वातावरणात गणिताची भीती मुलांच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. सोबत शिक्षकांनी शिकवतांनाच मुलांना बहुपर्यायी प्रश्न कसे तयार करतात त्याचे मार्गदर्शन केले. इयत्ता 11, 12 वीच्या विद्यार्थ्यांना गणितातील विशिष्ट संकल्पनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
1यांची होती उपस्थिती
कार्यशाळेस मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी सतीश पठार, सुनील पाटील, नरेंद्र भावे, ए.एल.चव्हाण, व्ही.आर.पाटील, उषा पाटील, वाय.के.दिसावल, रजीष बालन यांच्यासह शाळेचे उपमुख्याध्यापक आर.बी.देशमुख, पर्यवेक्षक डी.एस.पांडव, डी.के.महाजन, डी.व्ही.याज्ञीक, ए.टी.पाटील, गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी व तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी कला शिक्षक पंकज नागपुरे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सचिन करमरकर यांनी तर आभार प्रदर्शन अरुणा पाटील यांनी केले.गणित प्रयोगशाळा निर्मितीत पर्यवेक्षक डी.व्ही.याज्ञीक यांच्यासह एन.पी.राजपूत, ए.पी.पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रयोगशाळेच्या उद्घाटनात अभिनव संकल्पना वापरण्यात आली.