फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचा इशारा
फैजपूर- जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेयर व इतर दाखले या प्रतिज्ञापत्राची सक्ती सेतू सुविधेसह महा ई सेवा चालकांनी केल्याने नागरीकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचं लक्षात येताच फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सक्तीचे प्रतिज्ञापत्र अॅफेडेव्हीट बंद करण्याचे व अर्जदार यांचे स्वयंघोषणपत्र स्वीकारण्याचे आदेश नुकतेच काढले आहेत. रावेर-यावल तालुक्यातील सेतू सुविधा चालकांना आदेश त्याबाबत बजावण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेयर काढण्यासाठी नागरीकांना जास्तीच पैसे द्यावे लागत होते मात्र आता केवळ 60 ते 70 रुपयांत दाखले मिळणार आहेत.
तर दोषींवर दंडासह कारवाई
प्रांताच्या या निर्णयामुळे शैक्षणिक दाखल्यांसाठी नागरीकांची होणारी पायपीट व आर्थिक बचत होणार आहे. दाखले हे सेतू सुविधा मार्फत ऑनलाईन अपलोड केल्यानंतर दोन दिवसात मिळणार आहे. दाखल्यांसाठी नागरीकांना जवळपास 60 ते 70 रुपये खर्च येणार आहे यामुळे जास्तीचे पैसे घेणार्या व प्रतिज्ञापत्र साक्षांकित करण्याची सक्ती करण्यात येणार्या सेतू सुविधा, महा ई सेवा केंद्र संचालकांवर कायदेशीर कारवाई तसेच पाच हजार रुपये दंड आकारणी करण्यात येईल, असे आदेश फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिले आहेत.