प्रतिबंधित मिल्ट्री परीसरात चोरट्यांचा धुडगूस

0

बंद घर फोडले ; दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला ; नागरीकांना सतर्क राहण्याचे पोलीस यंत्रणेने केले आवाहन

भुसावळ- शहरातील आरपीडी रोडवरील प्रतिबंधित मिल्ट्री स्टेशन परीसरात चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत सुमारे दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आल्याने या भागात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे मिल्ट्री स्टेशन परीसर प्रतिबंधीत आहे. श्‍वानाने दीड किलोमीटरपर्यंत माग काढला तर या भागात सुरक्षा रक्षकही नसल्याची बाब समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बंद घराला केले टार्गेट
रमेश लाडूराज बारपासे हे व्यवसायाने प्लंबर असून आरपीडी कॉम्प्लेक्स परीसरातील गणेश मंदिराजवळील क्वार्टर टी.223/2 मध्ये राहतात. कामानिमित्त ते बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाला ड्रील करून कडी-कोयंडा उघडला. घरातील तीन पत्री पेट्या घरापासून काही अंतरावर नेवून त्यातील एक लाख 30 हजारांची रोकड तसेच अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र, अडीच ग्रॅमचे मणी, सात गॅ्रमचे टोंगल, तीन ग्रॅमची अंगठी, चांदीच्या बांगड्या असे एकूण 45 हजारांचे दागिने मिळून एक लाख 75 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला.

दरवाजांना ड्रील ; फासेपारधी गँगवर संशय
चोरट्यांनी घरफोडीत दरवाजाला आधी ड्रील केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाच पद्धत्तीने तालुका पोलीस ठाणे हद्दीत खेडी येथे काही महिन्यांपूर्वीच दिड लाखांची चोरी झाली होती तर सुमारे दिड वर्षांपूर्वी बाजारपेठ हद्दीतील बगीचा हॉटेलमागे चोरट्यांनी रोकड व दागिने लांबवले होते तर त्यावेळीदेखील दरवाजाला ड्रील केल्याचे दिसून आले होते. साधारणतः अशा प्रकारे घरफोड्या करण्याची पद्धत फासेपारधी गँगची असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहेत.

घरांना लावल्या कड्या, पँटही लांबवली
बारपासे यांच्या घराच्या रांगेत तीन घरे असून चोरट्यांनी या घरांमधून कुणी बाहेर येवू नये म्हणून बाहेरून कड्या लावल्या शिवाय शेजारील घराचा दरवाजा उघडा असल्याने संबंधिताची पँटही लांबवण्यात आली. त्यात दहा हजारांची रोकड होती. काही अंतरावर पँट व पाकिट चोरट्यांनी फेकलेले आढळले.

श्‍वानाने दाखवला चोरट्यांचा माग
पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याचे लक्षात आल्याने शहर पोलिसांना कळवल्यानंतर पावणे चार वाजेच्या सुमारास शहर पोलिसांचे गस्ती वाहन पोहोचले मात्र तो पर्यंत चोरट्यांनी पळ काढला. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले वकर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. जळगाव येथून ठसे तज्ज्ञ व श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले.श्‍वानाने नागसेन कॉलनी, कंडारी गेट पर्यंत चोरट्यांचा माग दाखवला तर येथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा संशय आहे.