प्रतिबंधीत क्षेत्रातील आजारी व्यक्तींची यादी तयार होणार

0

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रात आजार किंवा आजारी असलेल्या व्यक्तींची स्वंतत्र यादी तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जारी केले. ही यादी तयार करण्याची जबाबदारी नोडल अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या भागात रूग्ण आढळून आले आहे, अशी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहे. आता प्रतिबंधित क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यात प्रतिबंधित क्षेत्रात केवळ औषधी दुकाने व रूग्णालयांचे आंतररूग्ण विभाग सुरू राहणार आहेत. या भागात नियुक्त नोडल अधिकारी यांनी जीवनावश्यक वस्तु मागणीप्रमाणे सशुल्क घरपोच वितरीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. तसेच अत्यावश्यक वस्तु व सेवा यांचा पुरवठा सुरळीत सुरू राहील याची काळजी घ्यावयाची आहे.

आजार असलेल्यांची यादी तयार करा

प्रतिबंधीत क्षेत्रात मधुमेह, रक्तदाब, किडणी व हृदयाचे आजार, फुफ्फुसाचे आजार व अशा प्रकारचे तत्सम आजार असणार्‍या व्यक्ती, ६० वर्षे वयाच्या वर असणारे व्यक्ती, १० वर्षाच्या आतील बालके, गर्भवती महिला यांची सर्व माहिती संबंधित नोडल अधिकारी यांनी अद्यावत करून यादी तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या यादीतील सर्व व्यक्तींना दररोज मोबाईलद्वारे संपर्क करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करावयाची आहे. संबंधित व्यक्ती किंवा नागरिकांना औषधांची आवश्यकता भासत असल्यास नोडल अधिकार्‍यांनी ती तात्काळ उपलब्ध करून द्यायची आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलाही व्यक्ती बाहेर जाणार नाही किंवा बाहेरील व्यक्तींना त्या क्षेत्रात प्रवेश बंदी ( जीवनावश्यक वस्तु व सेवा देणारे वगळून) करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा आवश्यक असणार्‍यांना रिक्षा ऑन कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिक्षा चालकांना आवश्यक ते पासेस वितरीत करून त्यांची यादी पोलीस ठाण्यात द्यायची आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बँकेचे कामकाज दि. १७ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत.