जळगाव । प्रतिभा टेकाडे यांच्या ’सांजवेळ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन फेसबुकवरील कु्बेर समूहाच्या पुणे येथील स्नेहसंमेलनात दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नेत्ररोगतज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने, शास्त्रज्ञ हिंमतराव बावस्कर तसेच आयबीएन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. प्रतिभा टेकाडे हया मुळच्या महाराष्ट्रातील अमरावती येथील पण सध्या बंगळूरू येथे स्थायीक आहेत. कर्नाटकात असून सुद्धा त्यांना आपली मायबोली नेहमीच खुणावत असते. लहानपणापासूनच कवितेची आवड, अनेक वर्तमानपत्रात, नियतकालीकात त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. सोशल मीडीया व त्यातल्या त्यात फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या कवितांना व्यापक प्रसिध्दी मिळाली आहे.
कुबेरकरांचे अनमोल सहकार्य
त्यांच्याच एका कवितेत त्या म्हणतात,
’असेल मी,जरी नसेल मी
वाहतील काहींचे अश्रू थोडे…
परी राहतील हृदयात तुमच्या
शब्द माझे हे अमर वेडे…!!’
प्रतिभा टेकाडे सांगतात कुबेर समूहाचे व्यवस्थापक संतोष लहामगे यांनी आपल्या कुबेर समूहावर एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध केले. कुबेर म्हणजे कला क्षेत्राचं एक माहेरघर आहे.
प्रत्येकाला दिलेले प्रोत्साहन हे फार दिशादर्शक असल्याचे टेकाडे यांनी सांगितले. संतोष लहामगे आणि कुबेरकरांच्या सहकार्यामुळे त्यांची पुस्तक काढण्याची आकांक्षा जागृत झाली. तसेच त्यांचे पती मनमोहन टेकाडे, नातेवाईकांच्या प्रेरणेमुळे त्यांची प्रतिभा अधिकच फुलत गेली असे त्या सांगतात. ह्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे त्यांचा चारोळी संग्रह प्रकाशित होत आहे.. नंदीनी तांबोळी यांच्या नंदीनी प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशीत होत असलेल्या हया काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ जितू काळे यांनी केले आहे तर ज्येष्ठ साहित्यिक अरुण देशपांडे यांची प्रास्तावना लाभलेली आहे.