वरणगाव। नगर परिषद पाणी पुरवठा समितीची 30 रोजी नगरपालिका सभागृहात बैठक घेण्यात आली. यात प्रतिभानगर येथे पाण्याची टाकी यासह विविध विषय मंजुर करण्यात आले.
रात्रीचा पाणी पुरवठा बंद होणार
नगर परिषदेच्या सभागृहात पाणी पुरवठा समितीचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा समितीची बैठक घेण्यात आली. उन्हाळ्यात नागरीकांना पाण्याची अत्यंत गरज भासत असते. त्यामुळे पाणी पुरवठा करणारे कर्मचारी किरण प्रकाश जाधव, मयुर सुधाकर भंगाळे व शंकर अशोक जावळे यांची पाणी वितरणाच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रतिभा नगर येथील ओपन स्पेस मध्ये सहा लाख लीटरची टाकी करण्यात येणार आहे. तसेच रामपेठ व वार्ड नं 6 हा भाग पाणी पुरवठा करण्यासाठी मोठे असल्याने यातील काही भागात नेहमी रात्रीच पाणी सोडले जाते. यासाठी या भागाचे प्रत्येकी दोन भाग करण्यात येणार असून रात्री होणारा पाणी पुरवठा बंद होवुन दिवसा पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती सभापती नितिन माळी व गणेश धनगर यांनी दिली तर जलशुध्दीकरण केद्र येथे पाणि शुध्दीकरणासाठी क्लोरीण वायुचा वापर कसा करावा या करिता नगर परिषदेच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचा ठराव या बैठकित करण्यात आला. सभेला नगराध्यक्ष अरुणा इंगळे, सभापती नितिन माळी, सदस्य सुनिल काळे, गणेश धनगर आदी उपस्थित होते.