प्रतिभा पाटील उत्तम अभिनेत्री आणि दिग्दर्शक

0

‘गाव गाता गजाली’
गराणा या गोड मानून घे रे देवा रवळनाथा
होय महाराजा, होय महाराजा
इडा पिडा टळो पोरा टोरांक ठेव खुशाल आता
गाव गाता गजाली गाव गाता गजाली
बायको गेली पळाण म्हणून फिरतो असो गोळो
भेेैराइच्या कोंबड्यांवर गावाचो डोळो
झिंगाटवर नाचता बारक्याचो बोको
नाम्याच्या चेडवाचो प्रसादाशी टाको
आण्णांच्या आमराईत वाघ घुसलो
लोटो टाकूनच गोटो पळालो

मस्त टायटल असलेली सध्या झी मराठीवर धुमशान करणारी मालवणी मालिका ‘गाव गाता गजाली’ सर्व घराघरांत पसंतीची झाली आहे. मीसुद्धा काही मालिकेचे भाग आवर्जून बघतो. या मालिकेत बहिर्‍या सासूची भूमिका करणार्‍या अभिनेत्री प्रतिभा पाटील यांना बघून त्यांच्या सहज अभिनयाचे कौतुक वाटलं. अगदी स्पर्धेपासून त्यांना पाहिलंय. मराठी नाट्य स्पर्धा/व्यावसायिक नाटकातसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडत असत. अस्खलित मालवणी बोलणार्‍या व सहज वावर असणार्‍या या अभिनेत्री 1986 साली राज्य नाट्य स्पर्धेसाठी कला साधना या संस्थेतर्फे अनिल सोनारलिखित ‘बे दाहे शून्य’ या नाटकात मी भूमिका करत असताना एका शिक्षिकेच्या भूमिकेत प्रतिभा पाटील नावाच्या अभिनेत्री काम करत होत्या.

भूमिका छोटी होती, पण माझी त्यांची ओळख या नाटकांमुळे झाली. प्रतिभा पाटील यांना अभिनयाची प्रचंड आवड असल्यामुळे प्रत्येक भूमिका दिग्दर्शकांनी सांगितल्याप्रमाणे त्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी भरपूर मेहनत, प्रयत्न, तालीम करण्याची तयारी त्या करत होत्या आणि मोठ्या अभिमानाने सांगतात, आज मला जे काही अभिनयातील येतंय त्याचे सर्व श्रेय माझे दिग्दर्शक प्रामुख्याने उल्लेख करतात सतीश पुळेकर व केशवराव मोरे यांचा त्या दिग्दर्शकांनी दहा दहा तास रिहर्सल घेतल्यामुळे प्रत्येक भूमिका समजावून शब्दोच्चारावर लक्ष दिल्या कारणानं आज कुठल्याही क्षेत्रात नाटक असो मालिकेत काम करण्याची तयारी आहे. प्रतिभा पाटील या महानगरपालिकेत मोठ्या पदावर नोकरी करत असल्यामुळे त्यांना आवड असूनही व्यावसायिक रंगभूमीवर काम करता आलं नाही, पण त्यांनी नाटकात अभिनय करण्याची दिग्दर्शन करण्याची हौस महानगरपालिकेच्या व राज्य नाट्य स्पर्धेत पूर्ण केली.

महानगरपालिकेच्या नाट्यस्पर्धेत भस्म, डाऊन विथ द फेस्टिव्हल, दुष्टचक्र व राज्यनाट्य स्पर्धेत सुरेश जयराम लिखित ‘वैशालीची खोली’ या नाटकात दुहेरी भूमिका सादर करून अभिनयाचं पारितोषिक पटकावले. स्वतः दिग्दर्शन करावं मनात खूप होतं म्हणून प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेलं ‘पांढरा बुधवार’ हे नाटक प्रथम दिग्दर्शित करून भूमिका केली. ‘निष्पाप’, ‘आधे अधुरे’, बहिष्कृत अशा अनेक नाटकांत प्रमुख भूमिका करून त्यांनी अभिनयाची पारितोषिके मिळवली. स्पर्धेसाठी फक्त दिग्दर्शन केलेलं नाटक ‘के 5’ या मिलिटरीवर आधारित नाटकांचं अतिशय सुंदर दिग्दर्शन केलं होतं. त्याचे प्रकाशयोजनाकार राजन ताम्हाणे होते. प्रतिभा पाटील निवृत्तीनंतर राज्य स्पर्धेसाठी कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आवडीने काम करतात. प्रतिभा पाटील सध्या गाव गाता गजाली या मालिकेच्या शूटिंगसाठी सर्व कलावंतांसोबत कोंकणात राहत आहेत. त्यांच्या पुढील उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा।

– गुरुदत्त लाड
सरव्यवस्थापक जनशक्ति, मुंबई