प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे फुलगावात गरोदर व स्तनदा मातांना मार्गदर्शन

0

जागतिक स्तनपान सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा

भुसावळ- जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे तालुक्यातील आदर्श गाव फुलगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. मृणाल पाटील यांनी गरोदर माता व स्तनदा मातांना मार्गदर्शन करीत गरोदरपणात व बाळंतपणानंतर काय काळजी घेतली पाहिजे तसेच बाळाची कशी काळजी घ्यावी आदीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रसंगी महिलांना मार्गदर्शनावर आधारीत प्रश्‍न विचारून अचूक उत्तर देणार्‍या पाच महिलांना बक्षिसेही देण्यात आली. प्रसंगी गरोदर माता व स्तनदा मातांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. ‘आईचे दूध बाळासाठी अमृत’ या विषयावर रांगोळी व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.

निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पाचवी ते नव्वीच्या मुलींसाठी ‘मुलींच्या जीवनात शिक्षणाचे महत्व’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तिघाही स्पर्धेत मुली व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनीदेखील मार्गदर्शनात आपण जशी कुटुंबाची काळजी घेतो तशीच स्वतः ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

स्पर्धेतील विजेते असे
प्रश्नमंजुषा स्पर्धा- शोभा पाटील, ममता पाटील, साधना सोनवणे, सुरेखा सोनवणे, अनुराधा सोनवणे, रांगोळी व स्लोगन स्पर्धा- प्रथम ममता सोनवणे, द्वितीय चेतना पाटील, तृतीय विद्या महाजन, निबंध स्पर्धा प्रथम- रेश्मा पाटील, द्वितीय पायल महाजन, तृतीय सोनल चौधरी.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास फुलगाव सरपंच वैशाली टाकोडे, ग्रामपंचायत सदस्य हेमलता शिंदे, गायत्री चौधरी, कल्पना पाटील आदींची उपस्थिती होती. माजी सरपंच राजकुमार चौधरी, ग्रामसेवक नारखेडे अप्पा, नारायण कोळी, रवींद्र पाटील, सी.डी.पी.ओ.राकेश पाटील, पर्यवेक्षिका जयश्री जोशी, एम.डी.रोटे, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे सहकार्य लाभले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्या श्रद्धा चौधरी, सारीका यादव, अर्चना सोनवणे यांनी परीश्रम घेतले.