प्रतीकच्या अपंग पालकांना नुकसान भरपाई द्यावी

0

नागरी हक्क सुरक्षा समितीची मागणी

पिंपरी : मागील आठवड्यामध्ये नाशिक फाट्यावरील उड्डाणपुलावरील रस्त्यावर प्रतीक सावंत या दहा वर्षीय मुलाचा एका भरधाव मिनिबसने धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला. या मुलाच्या अपंग पालकांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनाद्वारे केली आहे.

कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिकफाटा उड्डाणपुलाजवळ वाहनांच्या अतिवेगामुळे वारंवार अपघात होत असतात. स्थानिक रहिवाशांनी सातत्याने महापालिकेला कळविले होते. मात्र महापालिका प्रशासनाने याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. हा अपघात बस चालकाच्या चुकीमुळे नाही तर महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. त्यामुळे प्रतीकच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असून नुकसानभरपाई म्हणून प्रतीक सावंत याच्या अपंग पालकांना एक कोटी रुपये देण्यात यावेत. महापालिकेच्या अपंग कल्याण योजनेअंतर्गत हे रक्कम त्यांना मिळण्याचा अधिकार आहे. मुलगा हयात असता तरी या अपंग पालकांना ही रक्कम मिळणारच होती.

त्यामुळे तातडीने संबंधित पालकांना एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात यावे. अन्यथा महापालिकेच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबद्दल मानवी हक्क आयोगाकडे व न्यायालयाकडे दाद मागावी लागेल असा इशारा मानव कांबळे यांनी दिला आहे.