औरंगाबाद/मुंबई : प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरु होईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी या समितीचे अध्यक्ष सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे सचिव एस. एस. संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार आदी उपस्थित होते.
साडेबावीस लाख शेतकर्यांची नोंदणी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी 22 ऑगस्ट 2017 पर्यंत 22 लाख 40 हजार 943 शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. शेतकर्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. ई-सुविधा केंद्रांवरील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकर्यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे आकारणार्या केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. 18 लाख 85 हजार 457 शेतकर्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15 सप्टेंबर 2017 पर्यंत राहील आणि 1 ऑक्टोबर 2017 पासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला आहे.