प्रत्यक्ष जीवनात बाप उपेक्षीत

0

चोपडा । साहित्य अन् प्रत्यक्ष जीवनात बाप उपेक्षित आहे. आईच्या तुलनेत बापचे प्रेम, काळजी, श्रम दुर्लक्षिले गेले. वडीलांचे कुटुंबातील स्थान महत्वाचे असले तरी फार चांगलं बोललं जात नाही. समाजात व्यसनी, तापट, मारझोड़ करणारा बाप असं चित्र समाजात रेखाटले गेले आहे. बापावरील कवितांमधून व्यक्तिमत्व विकासाचे पदर उलगडत गेले असे प्रतिपादन डॉ.संभाजी देसाई यांनी चोपडा येथे केले. ’असो’ मित्र परिवाराच्यावतीने जागतिक पितृ दिनानिमित्त पूर्वसंध्येला बापावरील कवितांचे वाचन व ’बाप’ माणसांच्या प्रातिनिधीक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच ’असो’ मित्र परिवाराच्या बापावरील कवितांचे वाचन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत कौतुक केले. नगर वाचन मंदिराच्या अमरचंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी देसाई हे होते. बापावर आधारीत कवितांच्या सादरीकरणाने उपस्थित भारावले होते.

कविता अभिवाचन
जागतिक पितृ दिनाचे औचित्य साधत बाप नावाच्या व्यक्तिमत्वाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावेळी जेष्ठ साहित्यिक कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बापावरील कवितांचे अभिवाचन करण्यात आले. गौरव महाले यांनी रावसाहेब कुवर यांची ’बाप, बैल, मी’ ही कविता, संजय बारी यांनी गणेश भाकरे रचित ’बाप गेला’, राधेशाम पाटील यांनी गौरवकुमार आठवले लिखीत ’बाप माझा’, तसेच योगेश चौधरी यांनी गोपाल खाडे रचित ’बाबा’, विलास पाटील-खेडीभोकरीकर यांनी रमेश टेंभीकरांच्या ’माझा बाप’, या कवितेचे अभिवाचन केले. कवी अशोक सोनवणे यांनी स्वरचित ’विसरायला हवं’ ही कविता अभिवाचनात सादर केली.

यशस्वींचा सत्कार
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले चोपडा येथील आशिष ईश्वर पाटील याचा यावेळी सत्कार करण्यात आला. रामदास पाटील, आधार वाडे, पी. बी. पाटील, ईश्वर पाटील, सुधीर पाथरकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारार्थी पी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

अडचणींचा सामना करणारा बाप
हरताळकर हॉस्पिटलचे डॉ.विकास हरताळकर यांच्या हस्ते जीवनातील मुलांची प्रत्येक अडचण सोडविणारी एकमेव व्यक्ति म्हणजे बाप. बापाशिवाय अडचणी कोणीही समजू शकत नाही. जन्मदाती आई असते मात्र जन्म सार्थक करण्यास हातभार लावणारा हा पाल्य असतो. असे प्रतिपादन हरताळकर यांनी केले. पाल्यांचे आयुष्य सुफल करण्यासाठी बाप रात्रंदिवस एक करीत असतो. बाप नाव हाच केवळ एक आधार असल्याचे त्यांनी सांगितले.

चोपड्यातील पहिला कार्यक्रम
बाप दिनाच्या औचित्य साधत चोपडा शहरात पहिल्यांदाच बापावरील पहिला आगळा वेगळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कविता अभिवाचनाला श्रोत्यांची उत्स्फुर्त दाद लाभली. ’असो’ मित्र परिवाराचे अध्यक्ष अशोक सोनवणे व कार्यवाह विलास पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. सूत्रसंचालन राधेशाम पाटील, प्रास्ताविक विलास पाटील, आभार संजय बारी यांनी मानले.