प्रत्यक्ष लैंगिक संबंध येणे म्हणजेच बलात्कार नसतो!

0

पुणे| प्रत्यक्षात संभोग म्हणजेच बलात्कार नसतो. इतर पद्धतीनेही झालेला शारीरिक, लैंगिक, मानसिक अत्याचारही बलात्कारच असतो. तशा प्रकारचे निवाडे यापूर्वी न्यायालयांनी दिले आहेत, असा जोरदार युक्तिवाद 41 वर्षीय पीडितेच्या बाजूने अ‍ॅड. बी. ए. अलूर व अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी काल विशेष सत्र न्यायमूर्ती एल. एल. येणकर यांच्या न्यायालयापुढे केला. तसेच, लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू असलेल्या 38 वर्षीय आरोपी रोहित टिळक यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणीही केली होती. तर टिळक यांच्या बाजूने अ‍ॅड. नंदू फडके यांनीही तब्बल साडेतीन तास युक्तिवाद केला. पीडितेचे पती विदेशात राहत असल्याच्या मुद्द्यासह पीडिता स्वतः 18 महिन्यांपासून विविध उच्च न्यायालयात वकिली करते. तिला गुन्हेगारी कायदा माहित आहे! असे फडके यांनी सांगितले. त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला अ‍ॅड. अलूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी पुढील सुनावणी 8 तारखेला ठेवली. त्यामुळे रोहित टिळक यांचा अटकपूर्व जामीन वाढला.

पीडितेचा गैरवापर झाला!
रोहित टिळक यांचे वकिल नंदू फडके यांनी न्यायालयापुढे बचाव करताना, पीडितेचे पती दोन मुलांसह विदेशात राहात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. बलात्काराची तक्रार दाखल करण्यापूर्वी आठ दिवस अगोदरच तिचे पती देशात आलेले आहेत. पती देशात असताना टिळक यांनी या महिलेवर बलात्कार केला काय? असा सवालही फडके यांनी उपस्थित केला. त्याला अ‍ॅड. अलूर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, बलात्कार होण्यासाठी संभोग घडणेच गरजेचे नाही. हा एका दिवसात घडलेला प्रकार नाही. टिळक यांच्याकडून असे प्रकार वारंवार घडले आहेत, तिचे लैंगिक शोषण, बलात्कार आणि छळ झाला आहे. एखाद्या महिलेचा पती विदेशात असताना, या महिलेचा गैरवापर झाल्याचे हे प्रकरण आहे, ही बाबही अ‍ॅड. अलूर व अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

न्यायालयाला स्क्रिन शॉट दाखविला!
महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमकीचा आरोप हा निव्वळ खोटा व बनाव असल्याचा बचाव अ‍ॅड. फडके यांनी केला. त्यावर अशाप्रकारचे खोटे आरोप ही महिला का करेल? असा प्रतिप्रश्न अ‍ॅड. अलूर यांनी उपस्थित केला. तर या महिलेला खोट्या तक्रारी दाखल करण्याची सवय आहे, असेही फडके यांनी न्यायालयास सांगितले. त्यासाठी दोन प्रकरणांचा संदर्भही त्यांनी दिला. त्यावर ही प्रकरणे खोटी नाहीत. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे, असा तपशील अ‍ॅड. अलूर यांनी दिला. पीडित महिला गत 18 महिन्यांपासून विविध उच्च न्यायालयात वकिली करते. तिला गुन्हेगारी कायद्याचे पुरेसे ज्ञान आहे. त्यामुळे हे प्रकरण ती उभे करत आहे, असे फडके म्हणाले. तेव्हा, अशा असंख्य महिला आहेत, ज्या टिळक यांच्याकडून अशाप्रकारे झालेल्या अत्याचाराला सामोरे गेलेल्या आहेत. त्यासाठी पुराव्यादाखल एक स्क्रिन शॉटच न्यायालयापुढे दाखविला. रोहित यांची पत्नी प्रणिती यादेखील पती बाहेरख्याली असल्याचे मान्य करतात, असे अ‍ॅड. अलूर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. फिर्यादी पक्षाच्यावतीने कालच्या सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे एक ऑडिओ रेकॉर्डिंगही सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात टिळक व पीडित महिला यांच्यात काय संभाषण झाले हे ऐकविण्याचा प्रयत्न होता. तथापि, त्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली नाही. त्यानंतर न्यायमूर्ती येणकर यांनी पुढील सुनावणी 8 ऑगस्टरोजी ठेवली. त्यामुळे टिळक यांच्या अटकपूर्व जामिनातही वाढ झाली.