प्रत्येकच बाबतीत टीम इंडिया ठरणार ऑस्ट्रेलियाला वरचढ

0

पुणे : ऑस्ट्रेलिया संघातील प्रत्येक खेळाडूसाठी आमच्याकडे प्लॅन तयार असून, खेळातूनच आमची व्यूहरचना दिसून येईल. कौशल्य किंवा स्लेजिंग स्टॅटेजीला चोख उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. प्रत्येक बाबतीत आम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ ठरू. आम्ही खेळाच्या प्रत्येक पैलूत म्हणजे गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात नक्कीच वरचढ ठरू, असा मला विश्वास आहे. संघ म्हणून आम्ही सर्वजण सध्या चांगला खेळ करत आहोत, असा विश्वास भारतीय संघाचा शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणे याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पुण्यात 23 फेब्रुवारीपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना होत आहे.

प्रत्येक खेळाडूसाठीचा प्लॅन
रहाणे म्हणाला, ऑस्ट्रेलियाची कोणतीही मालिका सुरू होण्याआधी ते विरोधी संघाचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मैदानावर वा मैदानाबाहेर काही करायचे ते करू देत. आमच्याकडे त्यांच्या प्रत्येक खेळाडूसाठीचा प्लॅन तयार आहे. तो मी इथे सांगू शकत नाही. तो स्किल वा स्लेजिंग वाईजदेखील असू शकतो. ऑस्ट्रेलिया विरूद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. त्यांचा संघदेखील समतोल आणि अनुभवी आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्याशी दोन हात करण्यास उत्सुक आहोत. मी ज्यावेळी दुखापतीतून पुन्हा संघात आलो, त्यावेळी मला टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार विराट कोहलीने चांगला पाठिंबा दिला. त्यामुळेच बांग्लादेशविरोधात मी चांगली कामगिरी करू शकलो, असे त्याने सांगितले.

खेळपट्टीबाबत सांगणे अवघड
ऑस्ट्रेलियाविरोधात मैदानात उतरताना तीन जलदगती गोलंदाज, तर दोन फिरकी गोलंदाजांसह खेळणे योग्य ठरेल. ते ज्यावेळी भारतात आले, त्यावेळी त्यांनी येथील खेळपट्टय़ा या फिरकीला अनुकुल असतील, असे गृहीत धरलेले असणारच. पण तरी त्यांच्या स्ट्रटेजी, गोलंदाजी यापेक्षा आमचा फोकस आमच्या खेळावरच अधिक आहे, असे अजिंक्यने स्पष्ट केले. पुण्यात पहिलीच कसोटी असल्याने खेळपट्टीबाबत आत्ताच काही सांगणे अवघड आहे.

सामन्याचा आनंद घेतील प्रेक्षक
पुण्यातील खेळपट्टी वेगळी आहे. त्यामुळे सध्या याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. खेळपट्टीबाबत सध्या वेट आणि वॉचची भूमिका आम्ही घेतली आहे. पहिल्या दिवसांनंतर खेळपट्टीबाबतचा अंदाज येईल. पुढील 4 दिवसांत ती कशी असेल, हे लक्षात येईल, याकडेही अजिंक्यने लक्ष वेधले. गहुंजेची खेळपट्टी आपला स्वभाव बदलणार नाही. मैदानावर पहिलाच कसोटी सामना असल्याने खेळपट्टी कशी रिऍक्ट करेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, लोकांना सामन्याचा आनंद निश्चित घेता येईल. सध्याचे वातावरण लक्षात घेता या सामन्यात तिसऱ्या दिवसांनंतर खेळपट्टी फिरकीला साथ देईल असे वाटते, असे मत गहुंजे स्टेडियमचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी व्यक्त केले.