प्रत्येकाने काळानुरूप बदलण्याची गरज

0

पिंपरी-चिंचवड । सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून, बदलत्या काळानुसार प्रत्येकाने बदलण्याची गरज आहे. समता भ्रातृ मंडळानेही हायटेक तंत्राचा उपयोग करत विवाहेच्छु वधू-वरांसाठी आयोजित केलेला वधू-वर परिचय मेळावा सर्वार्थाने यशस्वी झाला असून, यामध्ये सहभागी विवाहेच्छूंना मार्गदर्शकच ठरला आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार शिरीष चौधरी यांनी काढले. पिंपरी चिंचवड येथील समता भ्रातृ मंडळातर्फे भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथे दि. 4 नोव्हेंबर रोजी आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्यास उपस्थित विवाहेच्छु वधू-वर व पालकांना मार्गदर्शन करताना शिरीष चौधरी पुढे म्हणाले की, मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या मेळाव्याचे केलेले नियोजन कौतुकास्पद असून, याचा विवाहेच्छुंना चांगला फायदा होणार आहे. प्रत्येक वधू-वरास आपापल्या क्षेत्रातील सुयोग्य जोडीदार मिळण्यास याचा उपयोग होणार असून, विवाहेच्छुंनी स्वत:ला योग्य असा जोडीदार निवडून आपले जीवन आनंदी आणि सुखकर करावे, असा सल्लाही उपस्थित मुला-मुलींना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी दिला.

मेळाव्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाल्यानंतर विवाहेच्छु वधू- वरांची माहिती असलेल्या सूची पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मंडळाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास पालकांसह विवाहेच्छूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सुमारे दीड हजारांवर पालक, तसेच 280 विवाहेच्छु वधू-वर उपस्थित होते. यावेळी नाव नोंदविलेल्या प्रत्येक विवाहेच्छु वधू-वरांची एका स्मार्ट कार्डवर संकलित केलेली माहिती व्यासपीठावर लावलेल्या स्क्रीनवर दिसत होती. या वापरलेल्या आधुनिक तंत्राचे सर्वांनीच कौतुक केले. यावेळी उपस्थित समाजबांधव व मान्यवरांचे आभार मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बर्‍हाटे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अग्रवाल यांनी केले.

महापौरांचे सहकार्याचे आश्‍वासन
पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी अशा समाजाभिमूख उपक्रमास आपले कायम सहकार्य राहणार असल्याचे सांगून, वधू-वर परिचय मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय असल्याचे सांगितले. तसेच, विवाहेच्छु वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

मंडळाची कार्यकारिणी
विवाहेच्छु वधू-वर परिचय मेळाव्याचे सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीने नियोजन करणार्‍या पदाधिकार्‍यांमध्ये मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बर्‍हाटे, उपाध्यक्ष रघुनाथ फेगडे व घनश्याम जावळे, कार्याध्यक्ष भानुदास इंगळे, सचिव चुडामण नारखेडे, सहसचिव किरण चौधरी, खजिनदार सीताराम राणे, सहखजिनदार रमेश इंगळे, तंत्रज्ञान प्रमुख निनाद वायकोळे, जितेंद्र होले, सुरेश फेगडे, निखील राणे, डिंगबर महाजन, जयंत चौधरी, नरेंद्र पाटील, गिरीष पाटील, सौ. रेखा भोळे, मधुकर पाचपांडे, सचिन चौधरी, राकेश चौधरी. सौ. विभावरी इंगळे, सौ.सुलभा धांडे, सौ.गौरी सरोदे, सौ. पल्लवी चौधरी आदींचा समावेश आहे.

पुढच्या वर्षी मदतीसाठी स्वत: येणार : शिरीष चौधरी
वधू-वर परिचय मेळाव्याचे केलेले नियोजन पाहून शिरीष चौधरी एवढे भारावून गेले की, पुढच्या वर्षी दोन दिवस अगोदरच या मेळाव्याला मदतीसाठी येणार असल्याचे सांगितले. तसेच, या मेळाव्याला राज्यभरातून एवढा मोठा प्रतिसाद मिळत आहे, हे मला माहीत असते तर मी माझ्या मुलीला सुद्धा परिचय देण्यास घेऊन आलो असतो, हे सांगायला शिरीष चौधरी विसरले नाहीत.

आमदार लांडगे यांची आवर्जून उपस्थिती
वधू-वर परिचय मेळाव्यास आमदार महेश लांडगे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. तसेच, आपल्या मनोगतात त्यांनी समाजोन्नतीसाठी असे उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त करून, चांगल्या नियोजनाचे कौतुक करताना या मंडळास आपले कायम सहकार्य राहिल, असे आश्‍वासन दिले.

पालकांसह विवाहेच्छुंनी केल्या भावना व्यक्त
यावेळी परिचय मेळाव्यास उपस्थित विवाहेच्छु वधू-वरांनी आपल्या भावना व्यक्त करताना केलेले नियोजन व मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या सोयी-सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तर स्वत:चा परिचय करून देताना मंडळाच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आणि मंडळाने असा उपक्रम कायमस्वरूपी राबवून विवाहेच्छुंना आपला सुयोग्य जोडीदार निवडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

नियोजनाचे एकनाथ पवारांनी केले कौतुक
दरम्यान, या वधू-वर परिचय मेळाव्यास उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ भाजपाचे पक्षनेते एकनाथ पवार यांनीही नियोजनाचे कौतुक करून मंडळाचा उपक्रम इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. तसेच, अशा उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहिल, असे आश्‍वासन दिले.

मेळाव्यास उपस्थित असलेले मान्यवर
माजी आमदार शिरीष चौधरी, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, दैनिक जनशक्तिचे मुख्य संपादक तथा सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष कुंदन ढाके, नगरसेवक नामदेवराव ढाके, एलएमसी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर मिलींद चौधरी, एलसीसीआयचे अध्यक्ष रवींद्र चौधरी, भागवत चौधरी, उद्योजक अनिल परतणे, उद्योजिका भारतीताई भारंबे, दैनिक जनशक्तिचे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, उद्योजक रमेश ढाके, उद्योजक जनार्दन टेकडे, वसंत बेंडाळे, नरेंद्र महाजन, समता भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बर्‍हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.