प्रत्येकाने दररोज व्यायाम करावा

0

आमदार बाळा भेगडे : 2800 जणांना चष्मे वाटप

शिरगाव । प्रत्येकाने रोज आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून थोडे का होईना परंतु व्यायाम, योगासने करावीत आणि आपले आरोग्य अबाधित राखावे, असे प्रतिपादन मावळ विधानसभेचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी सोमाटणे येथे केले. येथील आरोग्य शिबिरातील लाभार्थ्यांना चष्मे वाटप करताना ते बोलत होते. दिवसभरात सुमारे 2,800 जणांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.

पवन मावळात 900 जणांना वाटप
तळेगाव येथे घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात डोळ्यांचे त्रास असणार्‍या लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 20 केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यात सोमाटणे, उर्से, पवनानगर, आढले, चांदखेड आदी केंद्रांचा समावेश आहे. पवन मावळात सुमारे 900 जणांना चष्मे वाटप करण्यात येणार आहे. याची सुरुवात सोमाटणेच्या केंद्रापासून करण्यात आली.

आरोग्य यज्ञ तेवत राहणार!
आरोग्य शिबिरातील शेवटच्या रुग्णाला जोपर्यंत मदत होत नाही तोपर्यंत हा आरोग्य यज्ञ तेवत राहणार आहे. या रुग्णांना लवकर मदत मिळावी यासाठी पुण्यातील 57 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांसोबत याबाबत बैठकही झाली आहे, असे भेगडे यांनी सांगितले. तालुक्यातून 5 जणांची एमआरआय, सिटी स्कॅन सारख्या चाचण्या होत आहेत. मशीनची क्षमता पाहून रुग्ण पाठवावे लागतात आणि यातही ज्याला सर्वात जास्त गरज आहे, असे रुग्ण प्रथम प्राधान्याने घेतले जात आहेत असेही भेगडे यावेळी सांगितले. याप्रसंगी सभापती गुलाबराव म्हळसकर, मच्छिंद्र मुर्‍हे, नितीन मराठे, बाळासाहेब घोटकुले, राजेश सातकर, विजय टाकवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुर्यकांत सोरटे, सूत्रसंचालन राजेश मुर्‍हे तर आभार अनंता आंद्रे यांनी मानले.