प्रत्येकाने प्रसन्न राहून आनंदी जीवन जगण्याची कला आत्मसात करावी

0

भुसावळ । जगात वाईटापेक्षा चांगले खूप आहे. त्यासाठी चांगल्यापर्यंत आपल्याला पोहोचता आले पाहिजे. परमेश्‍वराने दिलेले सुंदर आयुष्य कंटाळवाणे न जगता जीवन जगण्याची कला शिकून ज्ञानासह मनोरंजन जीवन जगण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी कमी आयुष्यात स्वतः आनंदी राहून जगाला आनंदी जीवन जगण्याचे शिकविले. प्रसन्नता ही भगवंताची पूजा आहे. यासाठी प्रत्येकाने प्रसन्न राहून आनंदी जीवन जगावे, असे आवाहन आचार्य महंत महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी येथे केले.

शिवाजी महाराजांचे पुजन
भुसावळ येथील ओसवाल पंचायती वाड्यात ज्ञानासह मनोरंजन हाच हेतू या गृपतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व नटराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

विचारवंतांच्या एकत्रीकरणातून चांगल्या विचारांची रूजवणूक
आचार्यांचा परिचय प्रा.उमाकांत पाटील यांनी तर बी.आर. पाटील यांच्या हस्ते गीता, चांगदेव चरित्र, श्रीफळ, मानपत्र व मोत्यांची माळ देवून आचार्यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन अमोल दंदाळे यांनी केले. प्रास्ताविकात गृपप्रमुख डॉ. जगदीश पाटील ज्ञानासह मनोरंजन गृपने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देवून सर्व विचारवंतांच्या एकत्रीकरणातून चांगल्या विचारांची रूजवणूक होत असल्याचे सांगितले.

यांचा झाला सत्कार
प्रकल्पप्रमुख ज्ञानेश्‍वर घुले यांनी ज्ञानरत्न पुरस्कार कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगितला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या 15 व्यक्तींचा ज्ञानरत्न पुरस्कार देवून आचार्य जनार्दन महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रमोद आठवले, पौर्णिमा राणे, प्रा.दिलीप ललवाणी, निलेश गोरे, डॉ. मनोज पाटील, सुनिल वानखेडे, प्रा. हृषीकेश पवार, खिलचंद पाटील, दिलीप वैद्य, श्यामकांत रूले, ललितकुमार फिरके, प्रा. पंकज पाटील, संदीप पाटील, अमित चौधरी, भानुदास जोगी यांना गीता, चांगदेव चरित्र, सन्मानपत्र व मोत्यांची माळ देवून ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यादीचे वाचन प्रा. श्रीकांत जोशी यांनी केले. पुरस्कारार्थी व्यक्तींतर्फे प्रतिनिधीक स्वरूपात पौर्णिमा राणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. दिलीप ललवाणी यांनी तर आभार संजय ताडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला ज्ञानासह मनोरंजन गृपचे दिडशे सदस्य उपस्थित होते.