प्रत्येकाने स्वच्छता हीच सेवा हा संकल्प करा

0

नंदुरबार । घर, परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य स्वच्छ झाले, तर देशही स्वच्छ होईल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वच्छता हीच सेवा आहे, असा संकल्प करावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद, नंदुरबार, स्वच्छता हीच सेवा अभियान आजपासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उदघाटन पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते आज सकाळी राडीकलम, ता. अक्राणी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार ङ के. सी. पाडवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी, शहादाचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सरपंच सुशीलाबाई पावरा, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर आदी उपस्थित
होते.

योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा
पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता हीच सेवा अभियानास आजपासून प्रारंभ झाला. या अभियानाच्या माध्यमातून सर्वत्र स्वच्छतेचा संदेश द्यावयाचा आहे. या अभियानात प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग नोंदवित आपले घर, परिसर, गाव स्वच्छ ठेवावयाचे आहे. या अभियानात सहभाग नोंदविण्याबरोबरच प्रत्येकाने शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे. या शौचालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. बांधकाम विभागाने शौचालयाचे सुलभ मॉडेल तयार करुन द्यावे. तसेच घरातील कचर्‍याची वर्गवारी करुन त्याच्यापासून सेंद्रीय खत तयार करावे. त्याचा शेतीसाठी उपयोग होवू शकेल. स्वच्छता हीच सेवा या अभियानासह विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार्‍यांनी संवेदनशीलता दाखवावी. योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जनतेला मिळवून दिला पाहिजे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. रावल यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.