मुंबई (संतोष गायकवाड)। शेतकर्यांना हवामानाचा अंदाज समजण्यासाठी राज्यात अडीच हजारापेक्षा जास्त स्वयंचलित केंद्र उभारण्याचे पाऊल राज्य सरकारने उचलले असतानाच आता राज्यातील प्रत्येक नागरिकालाही पावसाची स्थिती, वादळी वारे, आणि हवामान आदी संदर्भात माहिती मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून अभ्यास सुरू असून. राज्यासाठी एक मॉडेल तयार करण्याचा सरकारच्या विचाराधीन आहे.
नागरिकाला घरबसल्या त्याच्या मोबाईलवर मिळणार ही माहिती
राज्यातील प्रत्येक जिल्हयाचा हवामानाचा अंदाज हा स्कायमेटकडून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. तापमान, पर्जन्यमान, त्याचे प्रमाण अशी दैनंदिन माहिती मिळत असते. पण हीच माहिती प्रत्येक नागरिकाला घरबसल्या त्याच्या मोबाईलवर मिळाल्यास नागरिकांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच टूरवर निघालेल्या प्रवाशांना हवामानाच अंदाजन घेऊन प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. या दृष्टीकोनातूनच राज्य सरकाने अभ्यास करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी विविध पर्यायांकडून माहिती मिळविण्याचे काम सरकारी यंत्रणेकडून सुरू आहे. या सर्व बाबींचा सरकारी पातळीवर अभ्यास सुरू असला तरी यासाठी वेळ लागणार आहे. मात्र हे चांगल मॉडेल उभ राहू शकते असे मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकार्याने बोलताना सांगितले.
शेतकर्यासांठी महावेध प्रकल्पांचे काम सुरू
दुष्काळ आणि अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होऊन त्याचा मोठा फटका शेतकरी राजाला सहन करावा लागतो. त्याच अनुषंगाने हवामानाचा अचूक अंदाज समजण्यासाठी राज्य सरकारकडून महावेध प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहे. तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वार्याचा वेग व दिशा आदी हवामान घटकांची महत्त्वपूर्ण वास्तव माहिती (रिअल टाईम) उपलब्ध होणार आहे. हा महावेध प्रकल्प बांधा आणि चालवा या तत्त्वावर स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या मदतीने ही हवामान केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.
राज्यात 46 हवामान केंद्र
भारतीय हवामान विभागाची राज्यात एकूण 46 हवामान केंद्र आहेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट या सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या सुचनांसाठी या केंद्राकडून मिळणार्या माहितीवर अवलंबून राहावे लागते. मात्र आता अडीच हजार हवामान केंद्र स्थापन होणार असल्याने यावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
अधिकार्यांसाठी कार्यशाळा
मान्सूनपूर्व तयारीसाठी राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन संदर्भात 25 मे रोजी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत उच्चपदस्थ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हवामान, पर्जन्यमान, तापमान आदी संदर्भातील माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होत असते ती माहिती कशी उपलब्ध करून घ्यावी यासंदर्भातही मार्गदर्शन केले जाणार आहे.