पुणे| ज्यांनी केलेली कामे हजारो वर्षे लक्षात राहण्यासारखी असतात त्या व्यक्तींची स्मारके उभारली जातात. लहुजी साळवे यांचे काम तर लाखो वर्षे लक्षात राहण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे स्मारक या ठिकाणी निर्माण केले जाईल. त्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारतर्फे दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना केली. आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या 223 व्या जयंतीनिमित्त संगमवाडी येथील आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारकाला भेट देत अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे,भीमराव तापकीर आदी उपस्थित होते.
लहुजी साळवे यांच्या जीवनावर बनविणार चित्रपट
लहुजी साळवे यांचे स्वातंत्र लढ्यातील योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्यांनी पुढे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. राज्य शासनाच्या वतीने त्यांच्या जीवनावर एक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. या चित्रपटात त्यांच्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश असेल. हा चित्रपट देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भेट देणारे पहिले मुख्यमंत्री
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले. परंतु लहुजी साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देणारे फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले. मुख्यमंत्र्यांनीही बोलताना, या स्मारकाला भेट देण्यासाठी मलाही उशीर झाल्याचे सांगत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या स्मारकाला भेट दिलीच पाहिजे, असे सांगितले.
लठ्ठपणा हा रोगाची जननी
लहान मुलांमध्ये स्थूलता म्हणजे काय यांचे मी एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. लहानपणापासून मी स्थूल होतो. मात्र त्यावेळी मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. सध्या लहान मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण वाढत असून ते भारताच्या भविष्याला सक्रीयतेकडून निष्क्रियतेकडे घेऊन चालले आहे. लठ्ठपणा हा सर्व रोगाची जननी आहे. लहान मुलांनी मैदानी खेळ खेळणे कमी केले असून मैदानी खेळदेखील आज मुले कॉम्प्युटरवर खेळत असल्याने लहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
…तर मी मोदींकडे तक्रार करेन!
रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क आणि आणि जेटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालपणी जडणार्या स्थूलपणा विरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लहान मुलांमध्ये वाढत चालेल्या स्वच्छतेबाबतच्या जागरूकतेबाबत सांगताना फडणवीस म्हणाले की, ते एकदा आपल्या मुलीशी खेळत असताना त्यांनी पेपर नॅपकिनचा चेंडू बनवून तिच्या दिशेने भिरकवला. त्यावर त्यांच्या 8 वर्षांच्या मुलीने अशाप्रकारे कचरा केला तर तुमची थेट मोदींकडे तक्रार करेन असे ठणकवल्याचे त्यांनी सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.