प्रत्येक कामासाठी कर्मचारी घेतात पैसे; सिव्हिलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ

0

जळगाव । शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालय हे नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडत असते. यातच जिल्हा रूग्णालयात यावल तालुक्यातील पाडळसा येथील महिला रुग्ण प्रसुतीसाठी दाखल होती. मात्र डॉक्टर आणि परिचारीकांच्या दुर्लक्षामुळे ते दगावल्याचा त्यांनी आरोप केला. त्यानंतरही रुग्णाकडून कपडे बदलण्याचे पैसे घेतले. एवढेच नव्हे, तर प्रसुती कक्षातील रुग्णांना विचारणा केली असता कंत्राटी कर्मचार्‍यांनी प्रत्येक रुग्णाकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासोबत एका कडून पैसे घेवून सजेरीयन प्रसुति झालेल्या महिलेला चक्क बेड खाली करायला लावत दुसर्‍या महिलेल्या बेड दिल्याचा आरोपही महिलेच्या नातेवाईकांना केला. यामुळे जिल्हा रूग्णालयात चांगलाच गोंधळ उडाला होता. यात महिलेच्या कुटूंबिय व परिचारिकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

दुसर्‍या मजल्यावर नेण्यासाठी घेतले पैसे
यावल तालुक्यातील पाडळसा येथील वैशाली सुपडू कोळी (वय 27) या गर्भवती महिलेला 21 एप्रिल रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सिव्हीलमध्ये प्रसुतीसाठी दाखल केले होते. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत कोणीच त्यांची तपासणी केली नसल्याचे कोळी यांची वहिनी आणि परिचारीका असलेल्या दीपाली दिगंबर सोनवणे (वय 26) यांनी सांगितले. 9 वाजेला डॉक्टर आले. त्यांनी बाळाने पोटात घाण केल्याचे सांगितले. त्यानंतरही चार तासानंतर प्रसुती केली. त्यावेळी बाळ मृतावस्थेत जन्माला आले. डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळेच मृत बाळ जन्माला आल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. त्यानंतर नवीन इमारतीतील दुसर्‍या मजल्यावर वैशाली कोळी यांना शिफ्ट करण्यात आले. त्याचेही कंत्राटी कर्मचार्‍यांनी पैसे घेतले. तसेच कपडे बदलण्याचेही त्यांच्याकडून 200 रुपये घेतल्याचा आरोप सोनवणे यांनी केला.

पैसे दिले नसल्याने रूग्णाकडे दुर्लक्ष; नातेवाईकांचा आरोप
सिव्हील मधील मॅट वार्डमध्ये एकूण 78 रुग्ण दाखल आहेत. त्यांना विचारले असता जवळपास प्रत्येक रुग्णाकडून रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी, तसेच शस्त्रक्रीया विभाग (ओ. टी.) मधील काही कर्मचार्‍यांनी प्रत्येक रुग्णाकडून पैसे घेतल्याचे सांगितले. त्यात पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील मेनका भिमा चव्हाण यांची परिस्थिती नसतानाही पैशाची मागणी केली. मात्र त्या पैसे न देऊ शकल्यामुळे त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप त्यांच्या सासू कलाबाई भालचंद्र चव्हाण यांनी केला.

सिव्हीलमध्ये तणाव…
एकीकडे दुर्लक्षामुळे बाळाचा मृत्यू झाला. त्यात प्रत्येक कामासाठी पैसे द्यावे लागत असल्याने कोळी कुटुंबियांनी कर्मचार्‍यांकडे जाब विचारला. त्यावेळी कर्मचारी आणि कोळी कुटुंबियांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर अनेकांनी या ठिकाणी येऊन संताप व्यक्त केला. त्यामुळे सिव्हीलमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष
सिव्हीलमध्ये पैसे घेण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचेही दुर्लक्षच आहे. त्यांना अनेकवेळा या विषयी माहिती देऊन ते काहीच कारवाई करीत नाही. सिव्हीलमध्ये रुग्ण स्ट्रेचर वरून घेऊन जाण्यासाठी, साफसफाईसाठी, कपडे बदलण्यासाठी, रुग्णाकडे लक्ष देण्यासाठी 200 ते 300 रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याची माहिती रुग्णांनी दिली.