प्रत्येक डावात आमच्यासाठी कोहलीची विकेट महत्त्वाची

0

नवी दिल्ली – भारताचा कर्णधार विराट कोहली बरोबरच्या संघर्षाची ही तर सुरवात आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने व्यक्त केले. भारताच्या खडतर दौऱ्याच्या प्रारंभीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने विराटला शून्यावर बाद केले. पण, स्टार्क या पहिल्या यशावर समाधानी नाही. स्टार्क म्हणाला, मालिकेत अजून सहा डाव व्हायचे आहेत. या प्रत्येक डावात आमच्यासाठी कोहलीची विकेट महत्त्वाची असेल. त्याला लवकर बाद केले तरंच मालिका आमची होणार आहे. पुजारावर वर्चस्व राखणे सोपे आहे. पण, कोहली असा फलंदाज आहे की तो अपयशाने अधिक पेटून उठतो. त्याच्यात मुसंडी मारण्याची क्षमता आहे.

येणारी प्रत्येक कसोटी आमच्यासाठी महत्त्वाची
स्टार्क आणि कोहली हे ‘आयपीएल’मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून एकत्र खेळायचे. एकदा का नजर बसली की कोहली कसा धोकादायक आहे हे स्टार्क चांगले जाणून आहे. तो म्हणाला, ‘‘कोहली सर्वोत्तम फलंदाज आहे. आधीच त्याने या मोसमात धावांचा डोंगर उभा केला आहे. चार मालिकांत त्याने दुहेरी शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटीत तो अपयशी ठरला म्हणजे प्रत्येक कसोटीत ठरेलच असे नाही. त्यामुळे येणारी प्रत्येक कसोटी आमच्यासाठी महत्त्वाची असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी कसोटी बंगळूर येथे होणार असून, रांची आणि धरमशाला येथे अन्य दोन सामने होतील. गेल्याच आठवड्यात पुणे येथे झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात स्टार्कने पहिल्या डावात चेतेश्‍वर पुजारा आणि कोहली यांना एका चेंडूच्या अंतराने बाद केले होते. त्यानंतर भारतावर ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज वीज कोसळावी तसा कोसळला होता.