प्रत्येक तिसर्‍या शनिवारी आढावा बैठक

0

इंदापूर । तालुक्यात होत असलेली विकास कामांची माहिती व प्रगतीवर लक्ष रहावे व लोकांच्या समस्यांची ताबडतोब सोडवणूक व्हावी यासाठी इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी तालुक्यातील सर्व अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील अधिकार्‍यांची शासकीय बैठक आमदार दत्तात्रय भरणे यांनी तहसील कार्यालयात बोलविली होती. त्या बैठकीत आमदार भरणे बोलत होते. बैठकीच्या अगोदर आमदार भरणे तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रास (सेतु) भेट दिली. यावेळी सुविधा केंद्रात अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्रे पाहून ती व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना दिल्या. शाळा महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्षे चालू झाले असून विद्यार्थ्यांना विविध दाखले आवश्यक असतात. विद्यार्थ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर करा, अशा सूचना आमदार भरणे यांनी कर्मचार्‍यांना केल्या. यावेळी दाखला काढण्यासाठी आलेल्या लोकांच्या समस्या आमदार भरणे यांनी जाणून घेतल्या. तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूमचीही त्यांनी पाहणी केली.

तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांना सामान्य जनतेच्या समस्या वेळेवर सोडविण्यासाठी प्रोत्साहीत करून कर्मचार्‍यांना चांगले वळण लावले. त्याबद्दल भरणे यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे कौतुक केले. तहसील कार्यालयाच्या प्रत्येक विभागाच्या कार्यालयास भेट देऊन तेथे येणार्‍या लोकांची व तेथील कर्मचार्‍यांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतले. भरणे हे तहसीलमधील प्रत्येक खात्यास भेट देणारे पहिलेच आमदार ठरले आहेत.