प्रत्येक पुरूषाच्या यशात स्त्रीचा मोठा वाटा असतो – उल्हास पवार

0

कथकगुरू पं.रामलाल विमल भास्कर पुरस्काराने सन्मानित

निगडी : नामवंत संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने मानाचा विमल भास्कर पुरस्कार रविवारी दि. 3 फेब्रुवारी रोजी रायगढ घराण्याचे प्रसिध्द कथक गुरू पं. रामलाल बारेथ व मथुरादेवी बारेथ यांना नंदकिशोर सभागृह निगडी येथे प्रदान करण्यात आला. जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते 25 हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल, इत्यादी देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रसिध्द कथक नर्तक डॉ.पं. नंदकिशोर कपोते, प्रा.अंकल खुडे पाटील, महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, नगरसेविका सुमन पवळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात उल्हास पवार म्हणाले की, प्रत्येक पुरूषाच्या यशात स्त्रीचा हा मोठा वाटा असतो,आणि डॉ.नंदकिशोर कपोते यांनी पं. रामलाल यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही पुरस्कार देऊन गौरव केला हे कौतुकास्पद आहे.

पं. रामलाल म्हणाले की, यापुर्वी महान कलाकार कथकक्विन सितारादेवी, पं. बिरजू महाराज यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. यावेळी मलाही हा पुरस्कार देऊन सन्मानित केले, याचा मला विशेष आनंद होत आहे. कथकनृत्य हे माझे जीवन आहे. नंदकिशोर कपोते कलेच्या क्षेत्रात एवढे चांगले कार्य करीत आहेत हे अभिमानास्पद आहे. नंदकिशोर कपोते यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कपोते यांनी आभार मानले. सुत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पं.रामलाल यांची नृत्य कार्यशाळा संपन्न झाली. त्यांनी कथकनृत्यातील रायगढ घराण्याचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांना लास्य तांडव आमद ,दलबादल, परन अशा कथक नृत्यातील बंदिशी शिकवल्या.