आयुक्त सौरभ राव यांचे आदेश ; कामांना गती येण्यासाठी पहिल्या गुरुवारी बैठक
पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या कामांना गती मिळावी यासाठी आयुक्तांकडून यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी विकासकामांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यासाठीचे कार्यालयीन आदेश आयुक्त सौरभ राव यांनी
काढले आहेत.
महापालिकेकडून सुरू असलेली विकासकामे वेळेत मार्गी लावण्यासाठी खाते प्रमुख आणि क्षेत्रिय कार्यालच्या अधिकार्यांचा समन्वय असावा, अंदाजपत्रकाची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, तसेच नागरिकांची कामे मार्गी लागावीत यासाठी ही आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यात प्रत्येक विभाग प्रमुखाला आपल्या विभागातील कामांचा सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यासाठी समन्वयक म्हणून सहआयुक्त विलास कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून विकासकामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात मुख्यसभेत करण्यात येत आहेत. त्यातही तक्रार करणार्यांमध्ये सर्वाधिक सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आहेत. या शिवाय, पालिकेच्या पदाधिकार्यांकडूनही स्थायी समिती तसेच पक्षनेत्यांच्या बैठकीत विकासकामे होत नसल्याचा तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त राव यांच्याकडून आधी सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेऊन प्रत्येक विभागाची माहिती घेण्यात आली होती. त्यानंतर आता प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.