ह.भ.प.सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन
जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप सोहळा पार पडला उत्साहात
आळंदी : जीवनाचे अंतिम सत्य हे शांती आहे. त्यासाठी प्रत्येक मानव हा शांतीप्राप्तीसाठी ईश्वराच्या चरणी येतो. त्याच प्रमाणे संसारात राहून वैराग्यवृत्ती धारण केल्यास ईश्वर प्राप्तीचा मार्ग सापडतो. भारतीय संस्कृतीत घराला अन्यय साधारण महत्व दिले आहे. कारण संत तुकाराम महाराज यांनी संसार सांभाळूनच ईश्वर प्राप्ती केली होती. ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आहे. त्यांच्या विचारांवर आपण चालावे, असे मत ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याच्या कीर्तनात व्यक्त केले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यामानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 722 वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप लाखो वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील लाखो वारकर्यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलींचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. या वेळी विश्वरुप दर्शनमंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्यावतीने लाखो वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला.
महाप्रसादाचा घेतला लाभ
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. हा उपक्रम यापुढेही चढत्या श्रेणीने चालू राहील.
हे देखील वाचा
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, उर्मिला कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड, ह.भ.प.नारायण महाराज उत्तरेश्वर-पिंपरीकर, तुळशीराम कराड, काशीराम कराड, उषा कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते. ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांनतर किराणा घराण्याचे युवा गायक रामेश्वर डांगे यांचा अभंगवाणी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सुखद मुंडे यांनी पखवाजची साथ दिली. भारूड सम्राज्ञी श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांनी भारूडाचे सादरीकरण केले. या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रूजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या विश्वरूप दर्शन मंचावर आयोजित करण्यात येणार आहेत.
विश्वरूप मंचावरून झाले दर्शन
माऊलीच्या मंदिरात यावेळी खूपच गर्दी असते. त्यामुळे वारकर्यांना दर्शन घेता येत नाही. यासाठी, विश्वरूप दर्शन मंचावरून संजीवन समाधी सोहळ्याचे दर्शन लाखो वारकर्यांना घडविण्यात आले. प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी ईश्वरीय शक्ती ही महत्वाची असते. संतश्री ज्ञानेश्वर महाराजांनी अंतिम सत्य व ज्ञानाची पूजा करून गीतेवर भाष्य करून संपूर्ण मानव जातीचे कल्याण केले. त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटातून आता विश्व शांती, मानवता आणि सहिष्णूतेचा संदेश जगभर पोहचेल. यामुळे जगाला वारकरी संप्रदायाची ओळख झाली आहे. सृष्टीवरील 192 देशात कोणत्याही विद्वानांनी अशा प्रकारच्या घुमटाची निर्मिती केलेली नाही, यामध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानाचे शिक्षण दिले आहे. तेच शिक्षण आता संपूर्ण जगासमोर मांडण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, सर्वांना मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण देण्याची वेळ आली आहे.
संतांची सेवा श्रेष्ठ आहे
हरिद्वार येथील महामंडलेश्वर स्वामी डॉ. उमाकांतनंद सरस्वती म्हणाले की, या संसारात सर्वांनाच कार्य करावयाचे आहे परंतु खरा मानव तोच आहे ज्यांनी मानवकल्याणाचे कार्य केले आहे. त्यांना संत म्हणले पाहिजे. समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रवचनात संत महिमा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.बापूसाहेब मोरे-देहूकर म्हणाले की, संत सेवा हीच भगवंताच्या प्राप्तीचे महाद्वार आहे. भगवंताच्या सेवेपेक्षाही संतांची सेवा श्रेष्ठ आहे. देव हे भक्त वात्सल्य असतात तर संत हे जग वात्सल्य असतात म्हणून संताची महिमा ही शब्दात सांगता येत नाही. ह.भ.प.तुपे महाराज म्हणाले की, आपल्याला देह मिळाला हे आमचे भाग्य आहे. त्यामुळे या जन्मात आत्मज्ञान प्राप्त होणे हा दुर्मिळ योगच समजावा. त्यामुळे या देहाच्या माध्यमातूनच ईश्वर प्राप्तीसाठी वारी ही अत्यंत महत्वाची आहेच.