जळगाव। रक्तदान ही सेवाभावी चळवळ आहे. रुग्णांच्या जीवरक्षणासाठी रक्तदान करणार्या रक्तदात्यांचे आधार क्रमांक नोंदवून त्यांचे संलग्निकरण करण्यात यावे. जेणे करुन सॉफ्टवेअरद्वारे रक्तदात्याने केव्हा कुठे रक्तदान केले आहे याची माहिती कुठल्याही रक्तपेढीला कळावी व सर्वत्र सारख्या प्रमाणात रक्तपुरवठा उपलब्ध व्हावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे केले. तसेच यासंदर्भातील संगणकीय प्रणाली विकसीत करण्याच्या कामाला चालना द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य रक्त धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्ह्यातील रक्तपेढी संचालकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख रक्तपेढी संचालक उपस्थित होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते.
रक्तसंक्रमण नियमित करणे गरजेचे
राज्य रक्त धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात थॅलेसेमिया, हिमोफिलीया, सिकलसेल आणि ज्या ज्या आजारात रक्तसंक्रमण नियमित करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांना नियमित रक्तपुरवठा व्हावा यासाठी शासनान रक्त धोरण जाहिर केले आहे. त्यानुसार त्या- त्या रुग्णांना आपापल्या भागातील रक्त पेढीत रक्त पुरवठा उपलब्ध व्हावा. हा रक्तपुरवठा प्रमाणित सर्व चाचण्या उत्तीर्ण केलेला असावा. रक्ताची गरज पाहून कुणीही व्यक्ती अमिष व प्रलोभनापोटी अधिक वेळ रक्तदान करता कामा नये. तसेच कुठेही रक्तदान केले असल्यास त्याबदल्यात रक्त उपलब्धता आदींची सुविधा व्हावी यासाठी रक्तदात्यांचे आधार संलग्नीकरण आणि रक्त पिशव्यांचे बारकोडिंग करण्यासाठी संगणक प्रणाली व सॉफ्टवेअर विकसित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी उपस्थितांना सुचना केली की, सर्व रक्तपेढ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या रुग्णांना नियमित व वेळेवर रक्तपुरवठा करावा. रुग्णांची अडवणूक न करता हा रक्तपुरवठा करावा. रक्तपेढ्यांची तेथे होत असलेल्या चाचण्यांची, तसेच पुरवठा होण्याआधी रक्त हे प्रमाणित केल्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमित तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.