मुंबई: जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात फैलाव वाढला आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या ८९ वर पोहोचली आहे. दररोज संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने येत्या २७ मार्चपासून राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाची तपासणी करण्यासाठी टेस्टिंग लॅब स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रातील काही ठराविक शहरातच टेस्टिंग लॅब आहेत, आता संख्या वाढविण्याची आवश्यकता असून टेस्टिंग लॅब वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केले आहे. जनतेने सहकार्य करावे, काम नसेल तर घरातच राहावे, जमावबंदी आदेश असल्याने त्याचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
घरी राहून कोरोनाला हरवीता येईल असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील परिस्थिती फार घाबरून जाण्यासारखे नाही, परंतु सर्वांनी वैयक्तिक काळजी घ्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.