वाराणसी : भारतीय नागरिकांनी आपला प्रत्येक सण पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून साजरा करावा. ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे, असे आवाहन भाजपचे आग्रा शहराचे महापौर इंद्रजीत आर्य यांनी हिंद-बलोच फोरमने येथे आयोजित एका कार्यक्रमात केले असून यावरुन देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होण्याची शक्यता आहे.
भाषणाचा व्हिडिओ यू-ट्यूबवर
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताची भूमिका या विषयावर बोलताना महापौर इंद्रजीत आर्य यांनी पाकिस्तानवर तोफ डागली. केवळ सणासुदीलाच नव्हे तर, प्रत्येक कार्यक्रमाआधी पाकचा झेंडा जाळला गेला पाहिजे. तसे झाले तर पाकिस्तानचा पुळका असलेले लोक आपोआप वेगळे पडतील आणि पाकलाही चपराक मिळेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरला झाला आहे.
काश्मीरच्या नावावर पाकिस्तान दहशतवादी कारवाया करतोय. भारत-चीनमध्ये भांडणं लावण्याची कामं करतोय. आपणही त्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आलीय. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून हे करायला हवं. त्यासाठी आम्ही देशभरात मोहीम राबवणार आहोत.
– इंद्रजीत आर्य, महापौर, आग्रा