प्रत्येक सदनिकाधारकांना स्वतंत्र मालमत्ता कर बिल

0

मुंबई । मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसाट्यांना पालिकेतर्फे मालमत्ता कर आकारला जातो. एखाद्या सदनिकाधारकाने मालमत्ता कर भरला नाही, तर सोसायटींवर कारवाई होते. त्यामुळे इमारतींमधील प्रत्येक सदनिकाधारकांना स्वतंत्र बिले पाठवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2018 पासून ‘भोगवटा प्रमाणपत्र’ मिळणार्‍या नव्या इमारतींमधील सदनिकाधारक वा गाळेधारेकांना त्यांचे मालमत्ता-कर त्यांच्या नावासह व स्वतंत्रपणे मिळणार आहे. पालिकेच्या निर्णयामुळे सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे. गृहनिर्माण सोसायटीकडून कर भरण्यास विलंब झाल्यास पालिका सोसाट्यांना नोटीस बजावते. अनेकदा दंड आकारणे किंवा जलजोडणी खंडित केल्या जातात.

1 लाख 42 हजार सदनिकाधारकांना मिळणार देयके
पालिका प्रशासनाने याची दखल घेत, सदनिकाधारकांना स्वतंत्र देयक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रात सध्या सुमारे 2 लाख 75 हजार करपात्र इमारती आहेत. यापैकी सुमारे 28 लाख सदनिका व गाळे आहेत. या 28 लाख सदनिका / गाळ्यांपैकी साधारणपणे 1 लाख 42 हजार सदनिकाधारकांनी व गाळेधारकांनी आपल्या मालमत्ता कराची स्वतंत्र देयके महापालिकेकडे अर्ज व सोसायटीचे ‘ना हरकत’ घेऊन करवून घेतली आहेत, तर उर्वरितांना नवीन धोरणानुसार 1 एप्रिल 2018 पासून नव्या इमारतींमधील सदनिकाधारकांना किंवा गाळेधारकांना स्वतंत्र मालमत्ता कराची देयके मिळणार आहेत.

प्रशासकीय परिपत्रक जारी
यापूर्वी इमारतींवर मालमत्ता किंवा सहकारी सोसायट्यांवर कर आकारला जात होता. परंतु, सोसायटीमधील अंतर्गत बाबींमुळे मालमत्ता कर पालिकेकडे जमा करण्यास अडचणी येऊ लागल्याने महापालिकेने आता सर्वच नवीन इमारतींमधील सदनिका वा गाळेधारक यांना त्यांच्या नावासह स्वतंत्र मालमत्ताकर देयक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 एप्रिल 2018 रोजी किंवा त्यानंतर ‘भोगवटा प्रमाणपत्र’ मिळणार्‍या सर्व इमारतींना हा नियम लागू होईल, अशी माहिती अतिरिक्त संजय मुखर्जी यांनी दिली तसेच नवीन सोसायटी व विकासक यांच्यामध्ये मालमत्ता करावरुन अनेकदा वाद होतात.