प्रथमच तरुण रंगकर्मींचे वर्चस्व!

0

पुणे । अनेक वर्षांपासून प्रस्थापित म्हणून जागा अडवून ठेवणार्‍यांना यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणुकीत तरूणांनी दणका दिला आहे. या निवडणुकीत मतदारांनी अनेक प्रस्थापितांना ठेंगा दाखवत, युवा रंगकर्मींना निवडून दिले आहे. भविष्यात सांस्कृतिक विश्‍वातील नाट्य परिषदेसारखी महत्त्वाची संस्था तरुणाईच्या हातात गेल्याने नविन आणि चांगली काहीतरी घडेल अशी आशा निर्माण झाली आहे. नाट्यवर्तुळातही याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

मोहन जोशींचा अर्ज बाद
नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूकीसाठी राज्यभरातून दोन पॅनल्स तसेच अन्य उमेदवारही उत्सुक होते. काही रंगकर्मींच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे 60 जागांपैकी तब्बल 25 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली नाही कारण 25 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 35 जागांसाठी राज्यभरातून 77 उमेदवार इच्छुक होते. त्यामध्ये विद्यमान पदाधिकारी असणारे मोहन जोशी, लता नार्वेकर आणि दीपक करंजीकर हे मातब्बर विविध कारणांनी प्रक्रियेतून बाद झाले. मोहन जोशी यांचा अर्ज सुरुवातीच्या छाननी प्रक्रियेतच बाद झाला, नार्वेकर यांनी अर्ज दाखलच केला नाही, तर करंजीकर यांचा पराभव झाला.

60 पैकी 25 जागा बिनविरोध
निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ दळवी म्हणाले, निवडणूक प्रक्रिया घटनेनुसार पार पडली. राज्यभरातून 9 जिल्ह्यांतून 27 केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली गेली. 60 पैकी 25 जागा बिनविरोध निवडून आल्याने 35 जागांसाठी निवडणूक झाली. राज्यातील जिल्हानिहाय सदस्यसंख्या : मुंबई -11, मुंबई उपनगर -5, ठाणे-4, रत्नागिरी -2, कोल्हापूर -2, सांगली -3, सोलापूर -6, पुणे-7, नाशिक-3, नगर -2, जळगाव -2, लातूर -1, उस्मानाबाद -1, नांदेड -1, अकोला -2, वाशीम -2, नागपूर -3, बीड -2, बेळगाव -1 अशी आहे.

एप्रिल महिन्यात बैठक
निवडून आलेल्या उमेदवारांची आणि जुन्या कार्यकारिणीची एकत्र बैठक एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला होईल आणि त्यानंतर नवी कार्यकारिणी काम सुरू करेल. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे. तरुण रक्ताला संधी मिळते आहे, ही चांगली गोष्ट आहे, त्याचे स्वागत होत आहे.