प्रदुषणाबाबत लवादाने फटकारले

0

डोंबिवली। लवकरच मुंबईसह राज्यात गणेशाचे आगमन होणार आहे.त्याचबरोबर गणेश मूर्तीचे विसर्जन, निर्माल्या व कचरा यांमुळे प्रदुषण होते.मात्र याकडे मनपा दुर्लक्ष करतो,याविरोेधात डोंबिवलीतील डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन आणि मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन या संस्थांनी एकत्र येऊन एमआयडीसीमध्ये होणार्‍या तलावांच्या प्रश्नाबद्दल राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती.यावर सुनावणी झाली असता ज्याठिकाणी डोंबिवलीतील गणेश मंडळे व घरगुती गणपतीचे विसर्जन होते ते आजदे गावातील तलावामध्ये करण्यात येते.यामुळे त्याठिकाणी होणार्‍या प्रदुषण होते.याच प्रदुषणाबाबत हरित लवादाने कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेला फटकारले आहे. या प्रदुषणामुळे जलसृष्टी नष्ट झाली आहे.गेल्या वर्षीचा गाळ ही अजुन जसाचा तसा आहे.त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सन 2010मध्ये तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन महानगरपालिकेकडून सक्तीने व्हावे, अशी सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. नियमांचे कडक पालन करण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत.

मोठ्या मूर्ती विसर्जनाला मनाई
तलावाजवळ कृत्रिम तलाव बांधून त्याबद्दल जनजागृती करण्याची सूचना महानगरपालिकेला लवादाकडून करण्यात आली आहे. तसेच, रासायनिक रंगाचा वापर केलेल्या मोठ्या मूर्ती, पीओपीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. विसर्जनानंतर 48 तासांमध्ये या मूर्ती तलावातून काढण्यात याव्यात, असे आदेश लवादाने 2010च्या नियमांचे पालन करण्याच्या अंतर्गत दिले आहेत. तलावातील गाळ अजूनही काढण्यात आलेला नाही. यामुळे तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये कृत्रिम तलावाचे काम सुरू करण्यात आले आहे.

ऑक्सिजनची पातळी खालावली
डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन आणि मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन या संस्थांनी एकत्र येऊन एमआयडीसीमध्ये होणार्‍या तलावांच्या प्रश्नाबद्दल राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. गेल्यावर्षी तलावात गणेशाचे विसर्जन करण्यात आले होते.त्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी खालावली होती. यामुळे तेथील जलसृष्टी नष्ट झाली होती. त्यानंतरही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे प्रदूषणाची समस्या कायम होती. यामुळे याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाकडे अपील करून दाद मागण्यात आली होती.सन 2010मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. मात्र यांचे पालन महानगरपालिकेकडून करण्यात येत नाही. त्यामुळे येथील तलावाची दुरवस्था झाली आहे. म्हणूनच या नियमांचे सक्तीने पालन करण्याची गरज असल्याचे मत मांडत लवादाद्वारे पालिकेला सूचना करण्यात आली आहे.

पालिका अधिकार्‍यांची भेट
हरित लवादाने गणेश विसर्जनानंतर तलावात होणार्‍या प्रदुषणावरुन दिलेल्या निकालानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची भेट डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी घेतली. लवादाच्या आदेशानुसार अंमलबजावणी करून उपाययोजना करण्यास सहकार्य करावे, असे निवेदन चर्चा करून यावेळी मांडण्यात आले.