जळगाव : प्रदुषण ही एक जागतिक समस्या असून समाजात याबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी संशोधक, प्राध्यापक यांसारख्या लोकांनी पुढाकार घेवून काम केल्यास प्रदुषण कमी होण्यास मदत होईल असे मत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी व्यक्य केले.
नुतन मराठा महाविद्यालयातर्फे आयोजित “रिसेंट ऍडव्हान्सेस इन केमिकल इनव्हॉरमेंटल सायन्सेस’ एक दिवसीय राष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च व तंत्र विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डी.डी. बच्छाव, उमविच्या बी.सी.यू.डी चे संचालक प्रा.पी.पी. माहुलीकर, प्रा.डॉ. एम.डी. जहागीरदार, प्रा. के.एन. मोगरकर, प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, परीषदेच्या संयोजिका प्रा.माधुरी पाटील, समन्वयक बी.आर. पाटील उपस्थित होते. यावेळी दीपप्रज्वल करुन कार्यक्रमाला सुरवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात परीषद आयोजनामागील हेतू सांगत महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रा.डॉ. जहागीरदार यांनी रसायनशास्त्र आणि प्रदुषण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या दुष्टीने सामाजिक बांधिलकीतून संशोधकांनी संशोधन करावे असे आवाहन उपस्थितांना केले. तर प्रा. बच्छाव यांनी संस्थेचा आढावा घेत अन्न भेसळीच्या संदर्भात जागृती होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एन.जे पाटील यांनी केले तर आभार प्रा.डॉ. माधुरी पाटील यांनी मानले.
156 संशोधकांचा सहभाग
सदर परीषदेला राज्यभरातून सुमारे 156 संशोधक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता. यात प्रत्येकाने उत्कृष्ठ पध्दतीने विषयाला अनुसरुन संशोधन केलेले होते. दुपारच्या सत्रात या शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले यावेळी त्यांना उमविच्या अधिसभा सदस्या प्रा.रत्नमाला बेंद्रे, प्रा.व्ही.एस. गीते यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक स्वरुपात प्रमाणपत्र
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज.जि.म.वि.प्र.सह समाज संचलित वरणगांव येथील महाविद्यालयाचे प्रभारी प्रचार्य व रसायनशास्त्र विषयाचे जेष्ठ प्राध्यापक एल.बी. पाटील उपस्थित होते. यावेळी सहभागी दोन प्रतिनिधींना प्रास्ताविक स्वरुपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर प्रा.एम.डी, खैरनार, प्रा.मोते, प्रा. सोनवणे या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले तर आभार प्रा.बी.आर. पाटील यांनी मानले.