प्रदूषणप्रकरणी शिवसेनेने अधिकार्‍यांना विचारला जाब

0

पालघर : खैरापाडा हद्दीतील थिम्स वर्ड शाळेजवळील परिसरात घातक रसायनाने भरलेले ड्रम टाकल्याने शाळेतील 800 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. अशा घटनांना व प्रदूषणकारी कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ पाठीशी घालत असल्याने त्याबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा दक्षता समितीचे जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात धडकले. स्थानिक ग्रामस्थांनी जाब विचारत अधिकार्यांना चांगलेच धारेवर घेतले. प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाईबाबत महामंडळाचे अधिकारी चालढकल करत असल्याने जगदीश धोडी आक्रमक झाल्याने प्रदूषण महामंडळाचे अधिकारी हादरले होते.

तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणकारी कंपन्यांना प्रदूषण महामंडळाच्या अधिकार्यांसोबतच राजकीय पुढारी देखील कंपन्यांना पाठीशी घालत असल्याने उघडपणे प्रदूषणकारी कंपन्यांना कोणीच विरोध देखील करत नाही. घटनेचे गांर्भीय लक्षात घेत शिवसेनेच्या जगदीश धोडी यांनी आक्रमकपणे आपल्या मागण्या मांडत यामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार त्यांचे उत्पादन व भंगार मटेरियल आपल्या कारखान्याबाहेर पाठवतील तेव्हा प्रदूषण महामंडळ व पोलिस यांना ईमेलवर माहिती पाठवणे बंधनकारक करणे, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पाहणीदरम्यान दोषी असलेल्या कारखानदारांवर कारवाई केली जावी, परिसरातील गावांतील बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जावेत, तसेच अवधनगर व मान येथील भंगारवाल्यांना नोटीस काढून रासायनिक कचरा घेणार्यावर कारवाई केली जाईल अशा सर्व मागण्या महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने मान्य केल्या आहेत.