प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली

0

पुणे । गेल्या काही वर्षात शहरीकरण झपाट्याने वाढत गेले. त्यामुळे बेसुमारपणे नागरीकरण झाले. वाहनांची संख्या वाढली, शहरात सिमेंटची जंगले झपाट्याने वाढली. याचा परिमाण शहरातील वातावरणावर होऊन धुलीकणांचे प्रमाण वाढले, हवा प्रदूषण धोक्याची पातळी गाठली. मानवी आरोग्यास घातक असलेले गंधक (सल्फर संयुग), नायट्रोजन संयुग, धुलीकण (सुक्ष्म आणि अतिसुक्ष्म), ओझोन तसेच कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण हवेत वाढले आहे. शुक्रवारी सकाळी कात्रज आणि आळंदी परिसरातील प्रदूषणाचा स्थर धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. तर शिवाजीनगर, लोहगाव, हडपसर हे धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचले आहेत. लवकरच प्रदूषणावर नियंत्रण न मिळवल्यास पुण्याची अवस्था देखील दिल्ली इतकी दयनीय होण्यास वेळ लागणार नाही.

शहर दिल्लीच्या वाटेवर
शहरातील वातावरणात ओझोनचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, या वायूचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी असले, तरी दरवर्षी हे वाढत आहे. या वायूचे मानक 100 मायक्रो ग्रॅम आहे. तर शहरात हे प्रमाण 55 मायक्रो ग्रॅम आहे. विशेषत: लोहगाव, पाषाण व शिवाजीनगर, हडपसर येथे ओझोनचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण वाढल्यास श्‍वसनाचे आजार, डोळे सुजणे, डोकेदुखी, खोकला यासारखे त्रास होतात. त्यामुळे योग्य त्यावेळी काळजी न घेतल्यास आता पुण्याचा प्रदूषणाचा स्थर दिल्ली इतका होण्यास वेळ लागणार नाही.

विषारी वायूचे प्रमाण वाढले
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे वाहनांची संख्या वाढत असल्याने शहराच्या हवेत या विषारी वायूचे प्रमाणही वाढतच आहे. प्रदूषण वाढीसाठी ते कारणीभूत ठरले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वायूचे पातळीचे मानांकन 2009 नंतर अधिक कठोर केले आहे. ते 40 मायक्रो ग्रॅम आहे. मात्र, शहरात हे प्रमाण 50 ते 60 मायक्रो ग्रॅमवर पोहचले आहे. हवेतील धुलीकणांमध्ये पीएम (पार्टिकल पोल्यूशन)- 10 (10 मायक्रॉनपर्यंत लहान) आणि पीएम 2.25 (2.5 आकार असलेले धुलीकण) हे धुलीकण मानवी आरोग्यास धोकादायक असतात. यामुळे फुफ्फुसाचे आजार वाढतात.

पीएम धूलीकण आरोग्यास हानीकारक
धुलीकण वाढण्यास प्रामुख्याने इंधनाचे ज्वलन, बांधकामे, कारखाने व शेतीची कामे हे घटक जबाबदार आहेत. 2016 मध्ये या धुलीकणांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिलेल्या मानकापेक्षा जास्त आहे. शहरात धुलीकणांमध्ये पीएम-10 हे प्रमाण 60 मायक्रो ग्रॅमपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, हे प्रमाण शहरात 80 मायक्रो ग्रॅम आहे. 2011 मध्ये हे प्रमाण 145 मायक्रो ग्रॅमवर पोहोचले होते. ते 2015 पर्यंत खाली आले होते. मात्र, आता ते पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर पीएम 2.25 या धुलीकणांसाठी 40 मायक्रो ग्रॅम हे मानक असताना, शहरात मात्र हे प्रमाण 64 मायक्रो ग्रॅमवर पोहोचले आहे. हे धुलीकण आरोग्यास सर्वाधिक घातक असतात. हे नॅनो पार्टिकल्स आणि काजळीसाखे असणारे धुलीकण रक्तामध्ये मिसळून रक्त प्रदूषित करतात. पाषाण, शिवाजीनगर, लोहगाव, कात्रज व हडपसर येथे या धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

वाहनांची संख्या वाढली
पुण्यात शहरीकरण, औद्योगिकरण, कारखानदारी आदी कारणामुळे वृक्ष तोड होत आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. शहरातील खासगी वाहनांची संख्या 33 लाख 37 हजार 370 गेली आहे. परिसरात औद्योगिकीकरण आणि बांधकामे वाढल्याने हवा प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. वाहनांतील इंधनामुळे हवेत सल्फर डायऑक्साईड (गंधक) प्रमाण वाढत आहे. शहरात 2016-17 मध्ये हे गंधकाचे प्रमाण आतापर्यंत सर्वाधिक नोंदविले गेले आहे. त्याचेप्रमाण 42 मायक्रो ग्रॅम आहे. गंधकाची धोक्याची पातळी ही 50 मायक्रो ग्रॅम असली, तरी गंधकाचे प्रमाण 2011 ते 2015 या वर्षामध्ये सरासरी 28 ते 30 मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर होते. दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे नायट्रोजन ऑक्साईडची निर्मिती होते.