सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीएससी बोर्डासह सीबीआयलाही नोटीस जारी
गुरूग्राम : गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युमन ठाकूर या सात वर्षांच्या मुलाची हत्या झाली. प्रद्युमनच्या आई वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सीबीआय, हरयाणा सरकार आणि सीबीएससी बोर्डाला नोटीस जारी केली आहे.
आणखी आरोपी असू शकतात!
शुक्रवारी सकाळी 8.30 ते 9 च्यादरम्यान शाळेच्या स्वच्छतागृहात प्रद्युमन ठाकूरचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या हत्या प्रकरणात बस कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आली. हत्या झाल्यानंतर 24 तासांच्याआत ही कारवाई करण्यात आली असे असले तरीही या प्रकरणात अशोक कुमार हा एकटाच दोषी असेल असे वाटत नाही, असा प्रद्युमनच्या आई – वडिलांना संशय आहे. प्रद्युमन हत्याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
स्कूलच्या दोन अधिकार्यांना अटक
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही सरकार याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. खट्टर यांनी यासंदर्भात प्रद्युमनच्या वडिलांनाही आश्वासन दिले आहे. प्रद्युमनच्या हत्याप्रकरणात बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनीही खट्टर यांना फोन केला. तसेच ठाकूर कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनंतीदेखील केली. हरियाणा पोलिसांनी रायन इंटर नॅशनल स्कूलच्या दोन प्रशासकीय अधिकार्यांनाही अटक केली आहे. या प्रकरणातले खरे गुन्हेगार पकडले गेले नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा प्रद्युमनच्या आईने दिला आहे.