बारामती । प्रधानमंत्री आवास योजनेचा समाजातील दुर्बल घटकांना लाभ मिळवून देण्यात यावा. निकषाची पूर्तता करत असलेले लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशा सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंचायत समिती उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य भारत गावडे, प्रदीप धापटे, राहुल भापकर, अबोली भोसले, लीलाबाई गावडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे आदी उपस्थित होते.
जनहिताची कामे करावीत
तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची मंजूर कामे, सुरू असलेली कामे तसेच प्रलंबित कामांची माहिती गटविकास अधिकार्यांकडून त्यांनी जाणून घेतली. सुरू असलेल्या कामांची विस्तार अधिकारी व संबंधित गावच्या ग्रामसेवकाकडून पडताळणी करून घेण्यात यावी, अशा सूचना निकम यांनी केल्या. शासकीय रक्कमेचा विनीयोग होणे महत्वाचे असल्याचे निकम यांनी यावेळी सांगितले. पंचायत समिती सदस्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोणती कामे घेता येतील याची यादी देण्यात यावी, सदस्यांनी या योजनेतून आपल्या कार्यक्षेत्रात कामांची क्रमवारी ठरवून जनहिताची कामे करावीत, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली.
829 जणांना घरकुलाचा पहिला हप्ता
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2016-17 साठी एकूण 839 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यातील 829 जणांना पहिला हप्ता वितरीत केला असून 486 जणांना दुसरा हप्ता वितरीत केला आहे. तालुक्यातील घरकुलांची 11 कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्य शासन पुरस्कृत पंडीत दीनदयाळ उपाध्याय सहाय्य योजना सन 2016-17 साठी एकूण 5 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यापैकी एका प्रकरणाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. आणखी एक प्रकरणाचा पहिला व दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला असल्याचे प्रमोद काळे यांनी यावेळी सांगितले.
चांगल्या सेवा पुरवा
प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पंचायत समिती कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बारामती पंचायत समितीचे कामकाज जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जलद असल्याचे गौरवोद्गार काढले. कर्मचार्यांकडून कामकाजासंदर्भात अडचणी जाणून घेऊन नागरिकांना चांगल्या सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.