प्रधानमंत्री आवास योजनेच्या 12 हजार अर्जांची छाननी

0

पुणे । प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पालिकेकडे 101897 अर्ज आले आहेत. त्यापैकी 12 हजार जणांची छाननी पूर्ण झाली असून ऑगस्ट महिन्यात त्यांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल, असे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले. शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली.

शहरातील विविध विषयांबाबत शिरोळे यांनी पालिकेत आयुक्त कुणाल कुमार यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिति अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, गटनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, पालिकेतील विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. जायका अंतर्गत मुळा मुठा प्रदूषण कमी करण्यासाठी सल्लागारची नियुक्ती ऑगस्ट अखेर होणार असून त्याचे प्रत्यक्ष काम हे 15 सप्टेंबरला सुरू होईल, अशी माहिती कुणाल कुमार यांनी बैठकीत दिली.

शिरोळे यांनी यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहारानुसार शहरातील भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील विहिरींचे संवर्धन करण्यासाठी एक सर्वेक्षण होणार असून त्यासाठी एका महिन्याच्या आत एक संस्था नियुक्त करण्यात येणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी बैठकीत सांगितले. पाषाण तलाव शुद्धीकरण अंतर्गत तलावातील जलपर्णी हटवणे तसेच महानगर पालिकेच्या बाजूची ड्रेनेज लाइन बंद करणे आदी कामे सुरू आहेत. शहर सिलिंडर मुक्त करण्यासाठी आवश्यक डक्ट (खड्डे) खोदण्यासाठीचा कालबद्ध आराखडा एका आठवड्यात पालिकेला सादर करण्याचे निर्देश शिरोळे यांनी एमएनजीएल ला बैठकीदरम्यान दिले. लोहगाव विमानतळ येथील रिक्शा/ टॅक्सी स्टँड साठी सर्विस रस्त्यासंबंधी एक विस्तृत आराखडा तयार करण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले असून लुल्लानगर येथील उड्डाण्पुलाच्या कामाचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.