प्रधानमंत्री आवास योजनेचे 20 लाख परवडणारी घरे

0

नवी मुंबई । वाढती लोकसंख्या व त्यामुळे पायाभूत सोयीसुविधांवर येणारा ताण कमी करण्याचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबई हे शहर वसवण्यात आले. सुविकसित असलेले हे शहर भविष्यातही लोकसंख्या, पायाभूत सुविधा, रोजगार यांचा भार उचलणारे महाराष्ट्रातील सर्वांत सक्षम शहर असेल”, असे वक्तव्य महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी फोर्डेबल हाउसिंग व ब्लू इकॉनॉमी सिम्पोझियमचे उद्घाटन करतेवेळी केले. मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 कार्यक्रमाचा भाग असलेल्या या एकदिवसीय सिम्पोझियमचे (परिषद) आयोजन सिडकोने आपल्या बिझनेस सेंटर, वाशी येथे मंगळवारी रोजी करण्यात आले होते. नवी मुंबई हे विकसित शहर असल्यामुळे येथे वास्तव्यासाठी येणार्‍या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी परवडणार्‍या घरांची आवश्यकता आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे 2022 पर्यंत 20 लाख परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य साध्य करतेवेळी हे शहर मोलाचा वाटा उचलेल, असा विश्‍वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडल्यानंतर हे शहर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देण्यासाठी आता सज्ज झाले आहे, असे वक्तव्यही मेहता यांनी या वेळी केले.

मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदार परिषदेत 14,90,000 कोटी इतक्या मूल्याचे करार करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या अनुदानामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांना परवडणार्‍या दरांत घरे उपलब्ध होतील. बांधकाम क्षेत्रात ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही ते म्हणाले. या प्रसंगी सुधीर ब्रह्मे लिखित ‘एक्सप्लोरिंग दी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नवी मुंबई’ या पुस्तकाचे प्रकाशनही मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. 1945 साली सर्व प्रथम ठाणे खाडी पल्याड एक नवीन शहर विकसित करण्याचा मांडण्यात आलेला प्रस्ताव ते नवी मुंबईच्या इतिहासात आजतागायत घडलेल्या घटनांचा विश्‍वासार्ह व कालानुक्रमे आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी आपल्या प्रास्ताविकात विकासातील दोन महत्त्वाच्या विषयांबाबत आयोजित करण्यात आलेल्या या सिम्पोझियमची आवश्यकता विशद केली. सिडकोने समाजाच्या विविध स्तरांतील लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिडकोने पुढील 10 वर्षांत आणखीन 15,000 परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. घरांसाठीची मागणी वाढत आहे.

अशावेळी परवडणारी घरे पुरवण्याच्या दृष्टीने बांधकाम क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे भूषण गगराणी म्हणाले. सागरी विकासाशी संबंधित असलेली ब्लू इकॉनॉमी राष्ट्राच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देऊ शकते, असे मत श्री. गगराणी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील 720 किमीच्या किनारपट्टीपैकी 150 किमी इतकी किनारपट्टी कोकणाला लाभली आहे. कोकणातील या किनारपट्टीमुळे ब्लू इकॉनॉमी क्षेत्रात सिडको महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते, असेही ते म्हणाले. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “परवडणारी घरे हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.” प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचेही कर्तव्य आहे. मागील दोन दशकांत सिडकोने ज्या गतीने विकासाचे उद्दिष्ट गाठले आहे ते पाहता भविष्यातील आपले लक्ष्य सिडको निश्‍चितच पूर्ण करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गृहनिर्माण क्षेत्रात मागणी आणि पुरवठा यांचा समतोल ठेवणे महत्त्वाचे आहे, असे शिंदे या वेळी म्हणाले. आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात सिडकोला विकासकामे करतेवेळी आपला पूर्णपणे पाठिंबा देऊ, असेही ते या वेळी म्हणाले.

सुमारे 300 मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार नरेंद्र पाटील आणि पनवेलच्या महापौर कविता चौतमल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी परवडणारी घरे व ब्लू इकॉनॉमी या विषयावर चर्चा सत्र पार पडले. परवडणारी घरे याबद्दल बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे विविध पैलू उलगडून सांगितले. या वेळी त्यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, गृहकर्जासाठी सरकारी अनुदान, शासकीय संस्थांतर्फे शासकीय मालकीच्या जमिनीवर बांधण्यात येणारी घरे आणि खाजगी मालकीच्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या घरांचा पुनर्विकास हे या योजनेतील महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही क्षेत्रांतील अनेक दिग्गजांनी या वेळी आपले विचार मांडले. सुमारे 300 मान्यवर या वेळी उपस्थित होते.