मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; जळगावच्या आढावा बैठकीत अधिकार्यांना आवाहन
जळगाव- प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याची प्रगती समाधानकारक असून दिलेले उद्दिष्ट वेळेत प्रयत्न करून जिल्हा देशात पहिला आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे झालेल्या आढावा बैठकीत केले. ते म्हणाले कृषी व महसूल विभागाच्या अधिकार्यांनी शेताच्या बांधावर जावून पीक पेर्याची पाहणी करीत तसेच वस्तुस्थितीदर्शक सातबारा असायला हवा व हा उपक्रम मिशन म्हणून राबवावा, असे आवाहननी त्यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी शहरात मुख्यमंत्री सोमवारी आले आहेत.
विमानतळावर स्वागत
सोमवारी सकाळी जळगाव विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन तसेच विमानतळावर प्रशासनाच्यावतीने नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्यावतीने कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून फडणवीस यांचे स्वागत केले.
आढावा बैठकीचे निमंत्रण नाही -माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आढावा बैठकीचे निमंत्रण नव्हते शिवाय या बैठकीला आमदारांसह खासदारांनी उपस्थित राहणेदेखील अपेक्षित नाही मात्र नामविस्तार सोहळ्यासह नाट्यमंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमास आपण उपस्थित राहू, असे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. या कार्यक्रमासाठी स्वतः कुलगुरू तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला निमंत्रण दिले आहे त्यामुळे आढावा बैठकीला न जाण्यामागे नाराजी वगैरे हा काही प्रकार नाही, असेही ते म्हणाले.