प्रांताधिकारी अजित थोरबोले ; रावेरला तलाठी, कृषी सहाय्यकांना सूचना
रावेर- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ प्रगतीपथावर शेतकर्यांपर्यंत पोहचवा, या योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी तलाठी, कृषी साहाय्यक, ग्राम सेवक यांना स्वतंत्र गाव देऊन शेतकर्यांची माहिती गोळ्या करण्याच्या सूचना प्रांतधिकरी डॉ.अजित थोरबोले यांनी दिल्या. रावेर तहसील कार्यालयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकर्यांना मिळण्यासाठी तलाठी, कृषी साहाय्यक, ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. शुक्रवारपासून या योजनेवर काम सुरू होणार आहे तर पहिला दोन हजारांचा हप्ता लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
शेतकर्यांना कागदपत्रांबाबत आवाहन
तहसीलदार विजयकुमार ढगे, कृषी अधिकारी सुधाकर पवार, बीडीओ हबीब तडवी, वनक्षेत्रपाल आर.जी.राणे, सहाय्यक निबंधक गायकवाड आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाभरातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक उपस्थित होते. शेतकर्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक, शेतीचा उतारा आदी कागदपत्रे शेतकर्यांना जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.
असा मिळणार शेतकर्यांना लाभ
6 फेब्रुवारीला तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांचे योजनेसंदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण घेणे, 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गावनिहाय पात्र खातेदार शेतक र्यांची यादी तयार करणे व तपासून खात्री करणे, 10 ते 12 फेब्रुवारीला कुटुंबनिहाय वर्गीकरण करून खात्री करणे, 7 ते 15 फेब्रुवारीला शेतकर्यांची संगणकीकृत माहितीचे संकलन करणे, 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शेतकरी कुटुंबाची यादी गावांमध्ये प्रसिद्ध करणे, 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान नावांवर हरकती घेण्यासाठीचा कालावधी तसेच यादीमध्ये काही दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करणे, 20 ते 21 फेब्रुवारीदरम्यान शेतकर्यांच्या कुटुंबाची अंतिम यादी दुरूस्त करून तहसील कार्यालयात संगणकीकृत करून जमा करणे तसेच 22 ते 26 फेब्रुवारीदरम्यान संगणकीकृत शेतकर्यांची माहिती महाऑनलाईन संकेतस्थळावर पडताळणी करून अपलोड करण्यात येणार आहे.
यांना मिळणार नाही योजनेचा लाभ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माजी राज्यसभा सदस्य, आजी व माजी आमदार, खासदार, राज्यमंत्री, महापौर, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, निमशासकीय संस्थेचे कर्मचारी, शासकीय कार्यालयांमधील सर्व अधिकारी, आयकर भरलेल्या व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायीक, डॉक्टर, चार्टर्ड अकाऊटंट, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.