प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा फैजपूरकरांना लाभ घेण्याचे आवाहन

0

700 नागरीकांनी केले फार्म सादर ; आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थींना मिळणार योजनेचा लाभ

फैजपूर- ज्यांना घर नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणार्‍या लाभधारकांनी योग्य कागदपत्र सादर करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत 700 नागरीकांनी फार्म सादर केले असून जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन फैजपूर पालिकेकडून करण्यात आले आहे.

नगराध्यक्षांच्या हस्ते फार्मचे वितरण
फैजपूर शहरात मजूर, शेतमजूर , सर्वसामान्य नागरीकांचा अधिक रहिवास असून केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील सर्वसामान्य नागरीकांना या योजनेंतर्गत हक्काचे घर मिळण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थी सर्वेक्षणासाठी कंत्राट देण्यात आला असून गेल्या दोन महिन्यांपासून फैजपूर शहरात प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. यात शहरात नगरपरीषदेमार्फत अमळनेर येथील चेतन सोनार यांना सर्वेक्षण व फार्म भरण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. त्यात शहरातील प्रत्येक प्रभागातील आपापल्या वॉर्डात नगरसेवकांना ठेका दिलेल्या प्रतिनिधी सोबत राहून व फार्म भरण्यासासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वांसाठी घरकुले या योजनेचे फार्म मंगळवारी नगराध्यक्षा महानंदा होले यांच्या हस्ते लाभार्थींना वितरीत करण्यात आले. पालिका सभागृह , महात्मा गांधी बहुउद्देशीय हॉल व तडवी समाज बहुउद्देशीय हॉल अशा तीन ठिकाणी हे कॅम्पच्या माध्यमातून नागरीकांना फार्मचे वितरण करण्यात आले.

आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थींना मिळणार लाभ
सर्व्हे व फार्म स्वीकारण्याचा ठेका देण्यात आलेले टीममधील प्रतिनिधी हे आवश्यक कागदपत्रांसह हे फार्म स्वीकारण्याचे काम पालिका कार्यालयात दोन प्रतिनिधींची नियुक्ती करून करीत आहेत. या ठिकाणी प्रभारी नगराध्यक्ष कलीम खा मण्यार, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, नगरसेवक देवेंद्र साळी यांनी आढावा घेतला. आतापर्यंत 700 नागरीकांनी सर्वांसाठी घरकूल या योजनेत सहभागी होऊन मागणी अर्ज सादर केले आहेत. हे अर्ज पालिका कार्यालयात नियुक्त प्रतिनिधींकडे आणखी एक महिना भरापर्यंत सादर करता येणार आहे. नागरीकांनी या योजनेचा जास्तीत-जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या योजनेत शहरात जे आर्थिक दुर्बल घटक (झोपडपट्टीवासी) व अल्प उत्पन्न असणार्‍या लाभधारकांना सहभागी होता येणार आहे.