प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक पिंटू ठाकूर यांचा उपक्रम
भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील नागरीकांसाठी प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थी सर्वेक्षण शिबिराचे आयोजन या प्रभागाचे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी नुकतेच केले होते. योजनेबद्दल सविस्तर माहिती तसेच फायदे ठाकूर यांनी नागरीकांना समजावून सांगितले. प्रभागातील जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन दीनदयाल नगर परीसरात आयोजित शिबिरात ठाकूर यांनी नागरीकांना केले.
अल्प उत्पन्न गटाच्या लाभार्थींसाठी योजना
या योजनेंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही तसेच आर्थिक दुर्बल घटकांना (झोपडपट्टीवासी) व अल्प उत्पन्न असणार्या लाभार्थींना लाभ घेता येणार आहे. तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या लाभार्थीस 322 चौरस फूट घर बांधता येणार आहे. शहरातील बेघर तसेच योजनेच्या निकषात बसणारे भाडेकरूदेखील योजनेचा लाभ घेवू शकणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी सर्व कुटुंबियांचे आधारकार्ड, नगरपालिका कराच्या अद्ययावत पावत्या, घराचे लाईटबिल, बँकपासबुक स्व.प्रमाणित उत्पन्नाचा दाखला, पुरूष व स्त्रीचा पासपोर्ट फोटो, स्व.मालकिची गावठाण जागा किंवा नवीन ले आऊटमध्ये पलॉट असल्यास त्या जागेची कागदपत्रे, 2011 च्या जनगणनेनुसार यादीत लाभधारकाचे नाव असल्यास त्यापूर्वीपासून रहिवासी असल्याचा दाखला आदी कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. प्रभागातील नागरीकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.