भिवंडी । जेनेरिक औषधांच्या प्रसिद्धी, प्रचार आणि विक्री यासाठी वाहून घेतलेल्या गोरेगाव मुंबई येथील प्रबोधन औषधपेढी या संस्थेच्या ठाणे जिल्ह्यातील 3 र्या आणि साखळीतील एकूण 13व्या शाखेचे सोमवारी, 4 सप्टेंबर रोजी भिवंडी येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. भिवंडी महानगरपालिकेचे उपमहापौर, भिवंडी शहरातील मान्यवर अतिथी, औषधपेढीचे पदाधिकारी तसेच भिवंडीतील नागरिक या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित होते.
प्रबोधन औषधपेढी ही संपूर्ण महाराष्ट्रात जेनेरिक औषधांविषयीची चळवळ उभी करून सुमारे 100 जेनेरिक औषधपेढी शाखांची साखळी उभी करण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे त्यासाठी प्रबोधन औषधपेढीची टीम जोमाने काम करीत असून त्यांना इतर स्वयंसेवी, खासगी व शासकीय संस्थांनी तसेच प्रसिद्धी माध्यमांनी सर्व प्रकारे सहकार्य करावे , असे आवाहन देसाई यांनी केले. तर आजच्या महागाईच्या काळात जेनेरिक औषधे व्याधींनी त्रस्त अशा रुग्णांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी काळाची गरज बनली असून त्या विषयी अधिक जागृती होणे आवश्यक आहे.