प्रबोधन करून स्वामी विवेकानंदांनी दीनदुबळ्यांची केली सेवा

0

जळगाव । पुरोहितशाही हे भारताच्या अध:पतनाचे कारण आहे असे स्पष्ट मत मांडणार्‍या स्वामी विवेकानंद यांनी सामाजिक भेदभाव नष्ट झाले पाहिजे यासाठी प्रबोधन करुन दीनदुबळयांची प्रत्यक्ष सेवा केली असे प्रतिपादन डॉ.हेडगेवार रुग्णालयातील संचालक प्रकल्प डॉ.प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने डॉ.केशव बळीराम हेडगेवार व्याख्यानमालेतंर्गंत मंगळवार 2 जानेवारी रोजी डॉ.प्रसन्न पाटील यांचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे व्याख्यान झाले. केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव यांनी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेे होतेे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्योती राणे होत्या. मंचावर उपप्राचार्य व्ही.व्ही.सोनवणे, श्रीमती एस.एस.माहेश्‍वरी उपस्थित होते.

दुबळयांना बलवंतांपेक्षा जास्त संधी द्यायला हवी
डॉ.पाटील म्हणाले की, विवेकानंद यांच्या काळातील सामाजिक परिस्थिती गोंधळाची होती. धर्माच्या आधारावर समाज बांधला गेलेला होता अशा परिस्थितीत विवेकानंद यांच्या रुपाने समाजसूर्याचा उदय झाला. कर्मयोग, राजयोग आणि ज्ञानयोग यांची शिकवण त्यांनी दिली. ते हाडाचे समाज सुधारक होते. स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परदेशात गेले नव्हते तर या देशातील सगळयात शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावयाचे असल्याने ते विदेशात गेले होते. जातीभिमान बाळगणार्‍याबद्दल विवेकानंद यांना राग होता. सामाजिक संदर्भात गौतमबुध्दांची प्रशंसा त्यांनी केली होती. सामाजिक विकासात उन्नती, आर्थिक विकास अभिप्रेत आहे असे मानत. दुबळयांना बलवंतांपेक्षा जास्त संधी द्यायला हवी असे मत त्यांनी मांडले. यावेळी प्राचार्य डॉ.ज्योती राणे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रारंभी सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.संदीप नेरकर यांनी केले.