मुंबई । उपनगरांमधील क्रिकेट प्रेमींसाठी एक अपूर्व पर्वणी ठरलेल्या प्रबोधन मुंबई टी-20 या स्पर्धेला यावेळी 5 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मुंबईतील आठ अव्वल संघांचा सातत्याने सहभाग लाभल्याने लोकप्रिय ठरलेल्या या स्पर्धेचे यंदा अकरावे वर्ष असल्याने यावेळी अधिक भव्य प्रकारे आयोजन करण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. गेली 41 वर्षे गोरेगावमध्ये आंतर शालेय क्रीडा महोत्सव, जलतरण,टेनिस, तिरंदाजी,बुद्धिबळ अशा खेळांच्या दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करणारी असा प्रबोधनचा लौकिक आहे. त्यांची ही यशस्वी वाटचाल संस्थेचे संस्थापक आणि शिवसेनेचे नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. प्रतिवर्षाप्रमाणे स्पर्धेचा कालावधी चार दिवसांचा राहील.
यावेळी गतविजेत्या पार्कोफोन संघासमोर उपविजेत्या पय्याडे संघाचे मोठे आव्हान असेल. स्पर्धेमध्ये यजमान प्रबोधन – डी.वाय. पाटील स्पोर्टस असोसिएशन तसेच कर्नाटक स्पोर्टिंग, न्यू हिंद, एम.आय.जी.,सिंध स्पोर्टस क्लब, आणि दादर युनियन क्रिकेट क्लब हेही संघ दुर्लक्षित करण्याजोगे नाहीत. यंदाही विजेत्यांना रोख 1 लाख रुपये, उपविजेत्यांना 50 हजार तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला परंपरेनुसार मोटर बाईक अशी पुरस्कारांची योजना आहे. प्रत्येक सामन्यातला उत्तम खेळाडू अशी अन्य आठ पारितोषिकेही दिली जातील अशी माहिती संघटनेचे खजिनदार रमेश इस्वलकर यांनी दिली आहे. अंतिम सामन्याला दिलीप वेंगसरकर, बापू नाडकर्णी, उमेश कुलकर्णी,करसन घावरी, कुरूविला असे कसोटीपटू आणि मुंबई क्रिकेटमधील शरद हजारे, अब्दुल इस्माईल,अमोल मुजुमदार असे दिग्गज आवर्जून उपस्थित असतात.